गोंदिया : जिल्हा परिषद शाळा (School) ओस पडत आहेत, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे, अशी ओरड आपण नेहमीच ऐकतो. कारण, सध्याच्या पालकांचा कल कॉन्व्हेंट स्कूलकडे वाढला आहे. हायप्रोफाईल इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आपली पोरं शिकावीत, असे सर्वच पालकांना वाटते. त्यातच, शासनाकडून झेडपी शाळांकडे होत असलेलं दुर्लक्ष किंवा या शाळांची दयनीय अवस्था पाहूनही पालक सरकारी शाळेत मुलांना पाठवताना दिसत नाहीत. अनेकदा गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला वर्ग नसतात, तर कुठल्या सोयी सुविधाही नसतात. आता, गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील एका शाळेची अशीच दयनीय अवस्था समोर आली आहे. येथील शाळेतील एका खोलीचा छत अचानक कोसळून वर्गातील 3 विद्यार्थी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  


गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील साईटोला येथे जिल्हा परिषदच्या १ ते ४ पर्यंतच्या शाळेचे वर्ग भरतात. आज गुरुवारी 3 वाजेच्या सुमारास विद्यार्थी वर्गात असताना अचानक स्लॅबचा प्लास्टर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडल्याने एक विद्यार्थी गंभीर तर तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे एकाच खोलीत चार वर्ग शैक्षणिक धडे घेत असताना यातील तिसरीचे 6 विद्यार्थी गणवेश पाहण्यासाठी आले असता अचानक त्यांचे अंगावर स्लॅलचा प्लास्टर कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी तर 3 किरकोळ जखमी झाल्याची दुर्घटना घडली. त्यानंतर, लगेच जखमी विद्यार्थ्याला प्राथमिक आरोग्य केंद्र कुराडी येथे औषध उपचारासाठी नेण्यात आले. सर्व शिक्षा अभियानांतर्गत 20 वर्षांपूर्वी साईटला येथील वर्ग खोलीचे बांधकाम करण्यात आले होते. सदर इमारत जीर्ण झाल्यासंदर्भात अनेकदा शिक्षण विभागाला माहिती देण्यात आली होती. पण, शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन वर्गात बसावे लागत आहेत. त्यातच आज गुरुवारी मोठी घटना घडली, सुदैवाने यात कोणतीही मोठी हानी झाली नाही. या घटनेनंतर स्थानिक पालकांनी उद्या शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. तर, शाळेची दयनीय अवस्था आणि शालेय प्रशासन विभागाची दिरंगाई देखील उघडी पडली आहे. 


हेही वाचा


मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्यातरुणाला जमावाने मागायला लावली माफी