हरिणाची बाईकवर झेप, अपघातात पोलिसाचा जागीच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 30 Dec 2017 07:40 AM (IST)
अपघातात पोलिस शिपाई राजेंद्र दमाहे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत बाईकवर असलेले नंदू खेरे जखमी झाले
गोंदिया : दुचाकीवर अचानक हरणाने झेप घेतल्यामुळे झालेल्या अपघातात एका पोलिसाला प्राण गमवावे लागले आहेत. गोंदिया आमगाव मार्गावरील मानेगावच्या जंगलात हा दुर्दैवी अपघात घडला. राजेंद्र दमाहे या पोलिस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रशिक्षण संपवून दमाहे ड्यूटीवर रुजू होण्यासाठी बाईकवरुन चालले होते. त्यावेळी अचानक हरणानं झेप घेतल्यामुळे अपघात झाला. अपघातात पोलिस शिपाई राजेंद्र दमाहे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत बाईकवर असलेले नंदू खेरे जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या अपघातात हरणाचाही मृत्यू झाला. गोंदियातल्या मानेगावच्या जंगलात मोठ्या संख्येनं हरणांचं वास्तव्य आहे. असं असतानाही वन विभागानं कोणतेही सूचना फलक या ठिकाणी लावले नाहीत. परिणामी मुक्या जीवांसह आता माणसांनाही जीव गमवावा लागत आहे.