नवी दिल्ली : इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स या देशातल्या प्रतिष्ठित संस्थेच्या अध्यक्षपदी भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून आज या नियुक्तीचं पत्र जारी करण्यात आलं. देशाच्या सांस्कृतिक इतिहासातली ही अतिशय मानाची संस्था आहे. १९५० मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या कल्पनेतून ही संस्था स्थापन झालेली होती. भारताचे इतर राष्ट्रांशी सांस्कृतिक बंध अधिक मजबूत करण्याचं काम ही संस्था करते, अटलबिहारी वाजपेयी, पी व्ही नरसिंहराव, शंकर दयाळ शर्मा, डॉ. करण सिंह यांच्यासारख्या नामांकित व्यक्तींनी या संस्थेचं अध्यक्षपद भूषवलं आहे.
२००५ ते २०१४ इतक्या दीर्घ काळासाठी डॉ. करण सिंह यांनी हे अध्यक्षपद सांभाळलं. त्यानंतर ऑगस्ट २०१४ पासून हे पद रिक्त होतं. राष्ट्रपतींकडून आज अखेर ही नियुक्ती करण्यात आली. यशवंतराव चव्हाण, वसंत साठे यांच्यानंतर हे पद सांभाळणारे विनय सहस्रबुद्धे हे तिसरे मराठी व्यक्ती आहेत.
मोदी सरकारमध्ये महत्वाची खाती मराठी व्यक्तींकडे असल्यानं महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले याची प्रचिती येत असतेच. आता देशातल्या या महत्वाच्या संस्थेची सूत्रंही मराठी व्यक्तीकडे आल्यानं मराठीजनांसाठी ती अभिमानास्पद बाब म्हणायला हवी.
देशाच्या अत्यंत प्रतिष्ठित संस्थेची सूत्रं मराठी माणसाकडे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Dec 2017 11:15 PM (IST)
इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स या देशातल्या प्रतिष्ठित संस्थेच्या अध्यक्षपदी भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची निवड करण्यात आली आहे.
विनय सहस्त्रबुद्धे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -