बीड : आपला व्यावसाय वाढवण्यासाठी कोण कसली शक्कल लढवेल, याचा काही नेम नाही. अशीच एक शक्कल बीडमधील केशकर्तनकाराने लढवलीय. बीडमध्ये नव्याने सुरु झालेल्या सलनमध्ये चक्क सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करण्यास सुरुवात केलीय.



बीडच्या बशीरगंज चौकात असलेले ‘सिजर’ नावाचं हेअर सलून सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय. बशीरगंज चौकातून जाणाऱ्यांना आपण एकदा तरी सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी केली पाहिजे, असं वाटल्याशिवाय राहत नाही. विशाल वाघमारे आणि आकाश झांबरे या दोन मित्रांनी मिळून सुरु केलेल्या या सलूनचे वैशिष्ट्यही तसे आहे.



अंगावर सोने घालणे हे जितके प्रतिष्ठेचे, तितकेच श्रीमंतीचे लक्षण असते आणि इथे तर चक्क अकरा तोळ्यांचा सोन्याचा वस्ताराने दाढी होत असल्याने ग्राहक मात्र मोठ्या आनंदाने येथे येत आहेत. सोन्याचा वस्ताऱ्याने दाढी केल्याचा एक वेगळाच आनंद बीडच्या नागरिकांनी अनुभवलाय. तर दुसरीकडे दाढी करण्यासाठी आपला नंबर कधी येईल यासाठी दुकानात चक्क रांगाच लागतात.



हा सोन्याचा वस्तरा सांगलीतील चंदुकाका सराफ यांनी बनवलाय. या वस्तऱ्याचे वजन 11 तोळे एवढे आहे. हा वस्तरा बनवायला तीन महिन्याचा कालावधी लागला. यासाठी 3 लाख 50 हजार रुपये खर्च आला. मजुरी 70 हजार रुपये त्यांनी स्वतंत्र घेतलीय. या सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करायची असेल, तर ग्राहकांना फक्त 150 रुपये मोजावे लागतात, तर साधी दाढी 50 ते 70 रुपयात करुन दिली जातेय.

दाढी करायचा रेट डबल असला, तरी अनेक हौशी लोक या वास्तर्‍याने दाढी करण्यासाठी वेटिंगवर असतात. एकदा सोन्याचा वस्तरा दाढीला लागला की दाढी केल्याच समाधान वाटतं, असे ग्राहक सांगतात.

या पूर्वी सांगलीतील एका सलून व्यावसायिकाने सोन्याच्या वस्तऱ्याचा पहिला प्रयोग केला होता. त्याची राज्यभर चर्चाही झाली होती. त्याच अनुषंगाने बीडच्या या तरुण व्यवसायिकांनी सोन्याचा वस्तरा आणून मराठवाड्यातला पहिला आणि महाराष्ट्रातला दुसरा वस्तरा ठरला आहे.