मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरु असलेली घसरण आजही सुरुच आहे. मंगळवारी संध्याकाळी बाजार बंद होताना सोन्याचा भाव 100 रुपयांनी घसरला. आज मुंबई आणि पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,120 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,120 रुपये इतका आहे. चांदीच्या भावात मात्र 200 रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीसाठी आता 67,800 रुपये मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्या-चांदीमधील गुंतवणूक कमी झाल्याने सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत.
गेल्या आठवड्यात 16 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 48,410 रुपये इतका होता. तो रविवारी 47,220 रुपये इतका झाला. आज सोन्याचा भाव हा 47,120 रुपये इतका आहे. 16 जून रोजी एक किलो चांदीचा भाव हा 71,300 रुपये इतका होता, तो आता 67,800 रुपये इतका झाला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सोन्या-चांदीचे भाव घसरताना दिसत आहेत. सोन्याच्या भावात आजही घसरण सुरुच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर आलेल्या आर्थिक मंदीचा परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत घट झाल्याचं दिसून येतंय. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या आठ दिवसांत सोन्याच्या दरात जवळपास दीड हजारांची तर चांदीच्या दरात पाच हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर आर्थिक मंदीचं सावट पसरले आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल काहीसा कमी झाल्याने सोन्याच्या मागणीत घट झाल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास दहा हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या :
- कोरोनामुक्त झालेल्या गावात दहावी बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत तपासणी करावी, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
- वसईच्या तरुणीला सोशल मिडियावरील मैत्री भोवली, सूड भावनेतून मित्रानं संबंध शहरालाच धरलं वेठीस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- अतिधोकादायक इमारती प्रश्नी उल्हासनगर महापालिका अॅक्शन मोडमध्ये, 48 तासांत 47 इमारतींचे पाणी, वीज कनेक्शन खंडित