जळगाव : कोरोनाच्या बाबतीत जळगाव जिल्हा हा सुरुवातीपासुनच हॉटस्पॉट ठरला होता. शासनाने विविध प्रकारचे निर्बंध लावत कोरोनावर आज नियंत्रण मिळविले असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, कोरोनाचे बदलते रूप असलेला डेल्टा प्लस या विषाणूचे राज्यातील एकवीस रुग्णांपैकी सात रुग्ण हे जळगाव जिल्ह्यातील असल्याचे सामोरं आल्याने जिल्हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.
जळगाव जिल्ह्याचे नाव या विषाणूसाठी पुढे आल्याने नागरिकांच्या मनात देखील भीतीचं वातावरण पसरले असल्याचं दिसून येत आहे. या संपूर्ण विषयावर नागरिकांच्या मनात असलेले संभ्रम दूर करण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदा घेऊन खुलासा केला आहे. या विषयावर बोलताना अभिजित राऊत यांनी म्हटलं आहे की गेल्या महिनाभरात राज्यभरातून सात हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आरएनओ नमुने तपासणी केले गेले होते. यातील जळगाव जिल्ह्यातील शंभर नमुने पाठविण्यात आले होते. त्यात सात नमुने हे डेल्टा प्लसचे आढळले आहेत. हे सर्व नमुने मे महिन्यात तपासले गेले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील सातही रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. त्यांच्यावर मे महिन्यात उपचार करण्यात आले होते. त्यांच्यामध्ये त्यावेळी कोणतीही गंभीर लक्षणे आढळली नव्हती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नव्हती. आजही हे सर्व रुग्ण बरे झाले असून त्यांची तब्बेत चांगली आहे. खबरदारी म्हणून या रुग्णांच्या नातेवाईकांचे आणि संपर्कात आलेल्या जवळच्या व्यक्तीचेही नमुने तपासण्यात आलेत. मात्र, त्यातही काही विशेष आढळून आलेले नाही. डेल्टा प्लस हा कोरोनाचा जनुकीय बदल झालेला हा नवीन व्हेरिएंट असला तरी तो चिंताजनक आहे किंवा नाही हे निष्पन्न होऊ शकलेले नाही. त्याचा अधिक सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.
त्यामुळे डेल्टा प्लस हा खूप घातक आहे किंवा घातक नाही हे आजच सांगणं अवघड आहे. अजून जास्तीचा अभ्यास होण्यासाठी अजून काही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा निष्कर्ष काय येतो हे पाहावे लागेल आणि जरी तो घातक स्वरूपातील असला तरी तो टाळण्यासाठी आपण खूप घाबरुन न जाता पूर्वी ज्याप्रमाणे खबरदारी घेत होते. त्या म्हणजे मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशन याच पालन आपण केले पाहिजे, अशा प्रकारची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदे मध्ये दिली आहे.