साईचरणी भाविकाकडून सुवर्णजडीत मुकुट अर्पण
एबीपी माझा वेब टीम | 20 Jul 2018 06:58 PM (IST)
साईबाबांना सोने, चांदी, हिरे-माणिक यांसह रोख रकमेचंही करोडोंच दान प्राप्त होतं. विशेषत: सुवर्णहार आणि सुवर्ण मुकुटाचं दान इतर सोन्याच्या आभूषणांपेक्षा जास्त आहे.
शिर्डी : साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. हे भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरुन दान देत असतात. मुंबई येथील एका साईभक्ताने साईचरणी 780 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असून, या सोनेरी मुकुटाची किंमत 22 लाख रुपये आहे. मध्यान्ह आरतीला सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्णजडीत मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आला. दानशूर भाविकाने संस्थानला आपल नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे. साईबाबांना सोने, चांदी, हिरे-माणिक यांसह रोख रकमेचंही करोडोंच दान प्राप्त होतं. विशेषत: सुवर्णहार आणि सुवर्ण मुकुटाचं दान इतर सोन्याच्या आभूषणांपेक्षा जास्त आहे. संस्थानकडे आज मितीला एक डझन मौल्यवान हार, तर दोन डझनांहून अधिक सोन्याचे मुकुट भाविकांनी दान स्वरुपात दिले आहे. आज दान स्वरुपात मिळालेला मुकुट खुपच आकर्षक आहे. मुकुटावर अमेरिकन डायमंडचा साज चढवण्यात आला असून, ओम या नावाची छबी रेखाटण्यात आलीय. तर मुकुटाच्या वरच्या भागाला मोरपिसाने सजवण्यात आलंय. हा मुकुट दानशूर भाविकाच्या इच्छेनुसार मूर्तीवर चढण्यात आला. त्यामुळे मुकूटाच सौंदर्य आणखीच प्रभावी दिसत होतं. येणाऱ्या गुरुपोर्णिमा उत्सवादरम्यान हाच मुकुट मूर्तीला परिधान करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.