कोल्हापूर : सरकारने केलेली गाईच्या दूध दरवाढ कोल्हापूरच्या गोकुळ दूध उत्पादक संघाला अमान्य आहे. यामुळे दूध संघाचे दिवसाला लाखो रुपयांचं नुकसान होत आहे. या संदर्भात शासनाच्या दुग्ध (सहकार) विभागाने काढलेल्या नोटिशीविरोधात ‘गोकुळ’ हायकोर्टात जाणार आहे. या संदर्भात ‘गोकुळ’नं आज घोषणा केली.
कोल्हापूरचा गोकुळ दूध उत्पादक संघ हा राज्यातील सर्वात मोठा दूध संघ मानला जातो. या दूध संघाची उलाढाल कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. याच ‘गोकुळ’च्या मनमानी कारभाराविरोधात आमदार सतेज पाटील यांनी गेल्या आठवड्यात मोर्चा काढला होता. यावेळी सतेज पाटील यांनी शेतकरी दूध उत्पादकाला गायीच्या दुधाला गोकुळ शासन निर्णयापेक्षा प्रतिलिटर 2 रुपये कमी देत असल्याचं सांगितलं. एवढचं नव्हे तर यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
या संदर्भात शासनाच्या दुग्ध विभागाने गोकुळला नोटीस बजावून कारवाई करत असल्याचं म्हटलं होतं. या संदर्भात आज गोकुळनं गायीच्या दुधाला प्रतिलिटर 27 रुपये देणे अवघडं जात असल्याच म्हटलं.
तसेच शासन निर्णय काहीही असला तरी गायीच्या दुधाला गोकुळ प्रतिलिटर 25 रुपये देणार असल्याचं सांगितलं. शासनाने केलेली दूध दरवाढ गोकुळ दूध उत्पादक संघाला अमान्य आहे. त्यामुळं शासनाच्या दुग्ध (सहकार) विभागाने काढलेली नोटीस विरोधात गोकुळ हायकोर्टात जाणार असल्याची माहिती गोकुळनं दिली.