कोल्हापूर : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघासाठी काल ठरावधारकांनी मतदान केलं. सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा सामना यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. दोन्ही बाजूनं शक्तीप्रदर्शन करत विजयी होणार असल्याचा दावा कऱण्यात आला. मात्र गोकुळच्या निकालानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलणार हे नक्की आहे.


गोकुळच्या लढाईत पुन्हा एकदा सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा संघर्ष पाहायला मिळाला. गेली 30 वर्षे सत्तेत असलेल्या महादेवराव महाडिक, पी.एन पाटील, अरुण नरके यांनी सत्तेचा दावा केला. मात्र काल विरोधकांनी जे शक्ती प्रदर्शन केलं त्यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढली. जवळपास 2 हजार 280 मतदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे गोकुळ दूध संघ व्यापाऱ्यांचा हातातून शेतकऱ्यांच्या हातात जाईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.


सतेज पाटील यांच्या टीकेला आमदार पी एन पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. हा संघ कोणत्याच व्यापार्‍यांच्या हातात गेला नाही. 30 वर्षात शेतकऱ्यांच्या हातामध्ये हा दूध संघ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जात असतो. केवळ मतदानासाठी जात नाही असा टोला देखील पी एन पाटील यांनी सतेज पाटील यांना लगावला.


जिल्ह्यातील एकूण 70 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर जवळपास 50 ते 55 मतदार मतदान करू शकतील, असे नियोजन करण्यात आले होते. आता गोकुळच्या मतमोजणीसाठी केवळ काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे गोकुळमध्ये सत्तांतर होणार की नाही याकडं जिल्ह्यासह राज्यातील नेत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे...