कोल्हापूर : जिल्ह्यात गोकुळच्या माध्यमातून दूध संघावर नियंत्रण ठेवण्यासाठी राजकीय कुस्ती सुरु झाल्याचं पहायला मिळतंय. या कुस्तीत कोणता पहिलवान कोणत्या गटाचा हे आतापर्यंत बऱ्यापैकी स्पष्ट होत आहे. आता या रणधुमाळीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी गोकुळ निवडणुकीसाठी इच्छुकांनी किमान 10 लिटर दूध न थकता काढून दाखवावे अशी अनोखी अट घालण्याची मागणी केली आहे.
ज्यांना गोकुळची निवडणूक लढवायची आहे, त्यात भाग घ्यायचा आहे, त्यांनी न दमता किमान 10 लिटर दूध काढून दाखवावे अशी एक अट घालावी अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. अशी जर अट घातली तरच गोकुळ हा दूध संघ खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा राहिला असंही राजू शेट्टी म्हणाले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मात्तबर नेत्यांची धावपळ सुरु झालीय. कुणी प्रत्यक्ष तर कुणी छुप्या पद्धतीनं आपली रणनिती आखत आहेत. गोकुळच्या निवडणुकीत आकर्षणाच्या ठिकाणी दोनच नेते आहेत. एक म्हणजे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि दुसरे म्हणजे 25 वर्षे गोकुळवर वर्चस्व ठेवलेले महादेवराव महाडिक. गोकुळमधील विरोधक एक एक नेता विरोधी पॅनलमध्ये म्हणजे राजर्षी शाहू विकास आघाडीत घेत आहेत. तर सत्ताधारी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन आपली सत्ता भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत..
गोकुळ दूध संघावर गेली 25 वर्षे एकहाती सत्ता असलेल्या महादेवराव महाडिक यांच्यासमोर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी थोडक्यात हुकलेली सत्ता यावेळी कोणत्याही परिस्थितीत मिळवायचीच असा चंगच ना. सतेज पाटील यांनी बांधलाय. त्यामुळे गोकुळच्या या राजकीय कुस्तीत आता रंग भरायला सुरुवात झाली असून त्याचा धुरळा पार मंत्रालयापर्यंत उडाल्याचं दिसतोय.
गोकुळची सत्ता टिकवायची असेल तर सर्वांना सोबत घेण्याच्या दृष्टीने महादेवराव महाडिक यांनी बुधवारी सकाळी माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. गोकुळ हा अर्धा ते एक लिटर दूध उत्पादन करणाऱ्या सर्वसामान्य उत्पादकांचा संघ आहे आणि त्यावर कब्जा करण्यासाठी आता अनेक जण पुढे आले आहेत. त्यामुळे गोकुळ वाचवायचं असेल तर तुमची सोबत हवी असे साकडे महाडिकांनी राजू शेट्टींना घातलंय. ज्यांना ही निवडणूक लढवायची आहे त्यांनी गोकुळमधून किमान 30 टन पशुखाद्य घेतलं असलं पाहिजे अशी अटही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
इच्छुकांना 10 लीटर दूध काढण्याची अट घाला- शेट्टी
गोकुळ दूध संघ हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे असं वाटत असेल तर सर्वच इच्छुकांना एक अट घातली पाहिजे. ती अट अशी पाहिजे की इच्छुकांनी न थकता किमान 10 लीटर दूध काढून दाखवावे. गोकुळच्या निवडणुकीत नेत्यांच्याच मुलांना अधिक अर्ज भरल्याचं दिसत आहे. त्यामुळं इतर अटींप्रमाणे इच्छुकांना 10 लीटर दूध काढण्याची देखील अट घालायला हवी असंही राजू शेट्टी म्हणालेत.
महादेवराव महाडिक यांनी जरी आज भेट घेतली असली तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय अजून कळवलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन दोन दिवसात आपला निर्णय शेट्टी कळवणार आहेत. महाडिकांनी संपर्क साधला असला तरी अजून विरोधकांनी कोणताही संपर्क शेट्टी यांच्याशी साधला नाही.त्यामुळं स्वत: हून कुणाच्या मागे जाणार नसल्याची भुमिका राजी शेट्टी यांनी स्पष्ट केलीय.
महत्वाच्या बातम्या :