रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पेढे आणि परशुराम या दोन गावातील हजारो ग्रामस्थ रस्त्यावर उतरली आहेत. ग्रामस्थ मुंबई-गोवा महामार्गावरून चिपळूणच्या प्रांत कार्यालयावर आपला मोर्चा घेऊन निघाली आहेत. या ग्रामस्थांची समस्या ऐकून तुम्हीही विचारात पडाल.


पेढे आणि परशुराम या दोन गावातील जमिनीवर 1970 नंतर सरकारने या गावातील परशुराम देवस्थानचं नाव लावलं आणि तेव्हापासूनच या गावांचा विकासच ठप्प झाला, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

प्रत्येक शेतकऱ्याच्या सात बाऱ्यावर शेतकऱ्याच्या नावाबरोबर देवाचं नाव असल्याने इथला शेतकरी आपल्या जमिनीवर घर बांधू शकत नाही, शिवाय इथे कोणाला बँकेचं कर्जही मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत.

एवढंच नाही, 1970 नंतर या गावात आलेल्या नुकसानभरपाईचा एकही रुपया या गावातील शेतकऱ्याला मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या गावात सरकारचे पाच विविध प्रकल्प आले. सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. मोबदला म्हणून तब्ब्ल 200 कोटी रुपये आले, पण तेही सरकार दरबारीच राहिले. ते अजूनही मिळाले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

या गावाची जमीन मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी जात आहे. पण याचाही 40 कोटींचा मोबदला या शेतकऱ्यांना मिळणार नाही. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर देवाचं नाव लावल्यामुळे ही अडचण आहे.

सरकारने आता तरी आम्हाला या जोखडातून मुक्त करावं यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.