नागपूर: केवळ बलात्काराची धमकी दिल्यानंतर नाही तर गुंडाने बलात्कार केल्यानंतर तक्रार करायला या, असं धक्कादायक उत्तर नागपूर पोलिसांनी दिलं.
नागपूरच्या अमिता जयस्वाल या तरुणीनं काही दिवसांपूर्वी अतिक्रमणाविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर तिला गुंडांकडून धमक्या यायाला सुरुवात झाली आहे. याविरोधात ती पोलिसात गेली. त्यावेळी तिला पोलिसांनी हे धक्कादायक उत्तर दिलं.
सक्करदरा परिसरात राहणाऱ्या अमिता जयस्वालनं तिच्या परिसरातील एका अतिक्रमणाची तक्रार महापालिकेकडं केली होती. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर महापालिकेने ते अतिक्रमण काढले. मात्र यानंतर अमिता जयस्वाल आणि तिच्या कुटुंबियांना परिसरातील काही गावगुंडांनी जगणं मुश्कील करुन टाकलं आहे.
सध्या जयस्वाल कुटुंबियांच्या घरावर रात्री-अपरात्री दगडफेक केली जातेय.
हे गुंड मनात येईल तेव्हा जयस्वाल कुटुंबियांच्या घरावर हल्ला करतात, बलात्काराची धमकी देतात. नागपूर पोलीस मात्र गुन्हा घडण्याची वाट पाहात मौन धारण करुन आहेत.
हे गुंड जयस्वाल कुटुंबियांच्या खासकरून अमिताच्या मागे लागले आहेत. येता- जाता अश्लिल शिव्या देणे, चाकू - इतर हत्यारे दाखवून धमकावणे, रात्री अंधारात घरावर दगड फेकणे, घराच्या दारावर लाथा मारणे असे प्रकार अमिता सहन करत असतानाच, काल रात्री घरावर चालून आलेल्या 15 ते 20 लोकांच्या जमावाने अमिताला बलात्काराची धमकी दिली.
धक्कादायक बाब म्हणजे घाबरलेल्या अमिताने त्वरित सक्करदरा पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. मात्र, गुन्हा घडेल फक्त या आधारावर तक्रार घेता येत नाही, गुन्हा घडल्यावर तक्रार दे, असे सांगून पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी तिची तक्रार घेणे तर दूर, तक्रारीची पोच पावती देण्यासही नकार दिला.
याच वर्षी मार्च महिन्यात जेव्हा अमिताने महापालिकेकडे अतिक्रमणाबद्दल माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती आणि नंतर तक्रार दिली होती. त्यावेळीही अमिताच्या घरावर हल्ला झाला होता. तेव्हा मध्यरात्री अमिता आणि तिच्या भावाने घाबरलेल्या अवस्थेत खासदार नितीन गडकरी यांचे संपर्क कार्यालय गाठून स्वतःला वाचविले होते.
त्यावेळी नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून थेट पोलीस आयुक्तांना प्रकरणाची माहिती दिल्यानंतरही सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये काहीच कारवाई झाली नव्हती.
आम्ही या प्रकरणासंदर्भात सक्करदरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पवार यांना वारंवार फोन केले. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा दावा जयस्वाल कुटुंबाचा आहे.
दरम्यान, गुन्हा घडल्यावर त्याचा तपास करणे हे पोलिसांचे कर्तव्य असले, तरी घडू शकणाऱ्या गुन्ह्याला प्रतिबंध घालणे हेही पोलिसांचे कर्तव्य आहे. आणि बलात्कार घडला नाही ना.. घडल्यावर गुन्हा दाखल करू असे म्हणणारे नागपूर पोलीस फक्त कर्तव्यात कसूर करत नाहीत, तर निर्लज्जतेचे कळस गाठत आहे, असंच म्हणाव लागेल.
धमकीची नको, बलात्कार झाल्यावर तक्रार दे: नागपूर पोलीस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Nov 2017 12:04 PM (IST)
नागपूरच्या अमिता जयस्वाल या तरुणीनं काही दिवसांपूर्वी अतिक्रमणाविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर तिला गुंडांकडून धमक्या यायाला सुरुवात झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -