... अन्यथा बँका बंद करु, सहकारी बँकांचा इशारा
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2016 03:05 PM (IST)

नाशिक : चलन द्या अन्यथा उद्यापासून बँका बंद करु, असा इशारा नागरी सहकारी बँकांनी दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांच्या अध्यक्षांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. नाशिक जिल्ह्यात 44 नागरी बँका असून त्यांच्या 500 पेक्षा जास्त शाखा आहेत. 6 हजार कोटींच्या जवळपास ठेवी असलेल्या या बँका विशेषत: ग्रामीण भागात आहेत. या सर्व नागरी बँकांना राष्ट्रीयकृत बँकांनी 3 दिवसांपासून चलनच उपलब्ध करुन दिलेलं नाही. ग्राहकांना द्यायला चलन नसल्याने बँकेला ग्राहकांच्या रोषाला बळी पडावं लागत आहे. नोटा बदलून देणं तर सोडाच, पण चलनसुध्दा भरुन घेतलं जात नसल्यामुळे नागरी बँकात जमा होणारी कोट्यावधींची रोकड ठेवायची कुठे, असा प्रश्न नागरी बँकांना पडला आहे. भरणा स्विकारला जाणार नाही, वाटपासाठी चलन मिळणार नसेल तर बँका चालवायच्या कशाला, यामुळे ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं नागरी सहकारी बँक असोसिएशनने म्हटलं आहे. राज्य सहकारी बँका, निबंधक आणि सरकार यांनी तातडीने यात लक्ष घालावं, अशी मागणीही असोसिएशनने केली आहे.