सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथील सचिन नारायण सुरनरने गावातील अमोल कैलास शिंदे यांच्या बहिणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र सचिन सुरनर हा व्यसनाधीन असल्यामुळे शिंदे कुटुंबीयांनी या लग्नाला नकार दिला.
संतापलेल्या सुरनर कुटुंबाने तरुणीचे 45 वर्षीय वडील कैलास माणिकराव शिंदे यांना गावातील हातपंपाजवळ गाठलं. तुम्ही आम्हाला मुलगी का दिली नाही? अशी विचारणा करत त्यांच्या पोटात गुप्तीने वार केले. त्यामुळे कैलास शिंदेंचा जागीच मृत्यू झाला.
भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेले कैलास यांचे भाऊ भुजंग धोंडबाराव शिंदे यांनाही मारहाण करण्यात आली. जखमी भुजंग यांना उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आलं आहे. कैलास शिंदे यांचा मृतदेह हिंगोली शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला आहे.
या प्रकरणी अमोल कैलास शिंदे यांच्या तक्रारीवरुन सेनगांव पोलिसांनी सचिन नारायण सुरनर, किरण नारायण सुरनर, नितीन विश्वनाथ कवडे, विश्वनाथ नामदेव कवडे, गणेश नामदेव कवडे यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.