नागपूर : नागपुरात एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मयुरी हिंगणेकर असं 21 वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे. मयुरी तिच्या मित्रासोबत काल कोराडी मंदिरात दर्शनाला गेली होती, तेथे ही घटना घडली. याप्रकरणी चौघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मयुरी तिचा मित्र अक्षय नगरधने याच्यासोबत बाईकवर कोराडी मंदिरात दर्शनाला गेली होती. मयुरी आणि अक्षय दोघेजण गांधीसागर तलावाजवळून बाईकवरून जात असताना मागच्या दिशेने आलेल्या एका कारने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली होती.


या धडकेत मयुरीचा मृत्यू झाला, तर तिचा मित्र अक्षय यामध्ये गंभीर जखमी झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचं गृहीत धरुन पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र धडक देणाऱ्या गाडीचा तपास लागल्यानंतर एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलं.


याप्रकरणी अनिकेत साळवे याला पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेतने एकतर्फी प्रेमातून मयुरीचा पाठलाग करून त्यांच्या बाईकला मुद्दाम धडक दिली. त्यामुळे हत्येच्या उद्देशानेच अनिकेतने बाईकला धडक दिल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत साळवे आणि कारमध्ये त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.


एकतर्फी प्रेमातून गेल्या काही दिवसातील हत्येची ही नागपुरातील दुसरी घटना आहे. 1 जुलै रोजी सानिका थुगावकर या तरुणीवर अशाप्रकारे एकतर्फी प्रेमातून रोहित हेमनानी नावाच्या तरुणाने चाकू हल्ला केला होता. अडीच महिन्यांनतर सानिकाचा 20 सप्टेंबरला उपचारदरम्यान मृत्यू झाला होता.