अहमदनगर : बँकेतून घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी बँक मॅनेजर घरी आला म्हणून माजी उपसरपंचाने बँक मॅनेजरलाच मारहाण केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात घडलीय. विशेष म्हणजे मारहाण झाल्यानंतर देखील पोलिसांनी मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. अखेर पोलिस अधिक्षकांनी आदेश दिल्यानंतर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील माजी उपसरपंच मधुकर लगड यांनी इनोव्हा गाडीच्या कर्जासह 25 लाखांचे कर्ज सेंट्रल बँकेतून घेतले. मात्र कर्जाचे पैसे बँकेत न भरल्याने बँकेतून लगड यांना वारंवार फोन करण्यात आले. तरीही लगड यांनी प्रतिसाद न दिल्याने बँकेचे मॅनेजर मंजुनाथ नायक हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्ज वसूल करण्यासाठी मधुकर लगड यांच्या घरी गेले. मात्र लगड घरी नसल्याने बँक मॅनेजर यांनी घराचा फोटो काढला.

बँक मॅनेजर घरी का आले, असा सवाल करत मधुकर लगड यांनी सुरुवातीला बँक मॅनेजर मंजुनाथ नायक यांना फोनवरुन शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संध्याकाळी बँक बंद करुन घरी जात असनाता बँक मॅनेजर मंजुनाथ नायक यांना रस्त्यात अडवून मारहाण केली.

मारहाण झाल्यानंतर बँक मॅनेजरने बेलवंडी पोलिस स्टेशन गाठले. मात्र पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पडवळ यांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप मंजुनाथ नायक यांनी केलाय.

पोलिसांना तक्रार घेण्यास नकार दिल्याने बँक मॅनेजर मंजुनाथ नायक यांच्यासह बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी थेट पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांना निवदेन दिले. अखेर पोलिस अधिक्षकांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर बेलवंडी पोलिस ठाण्यात कोळगावचे माजी उपसरपंच मधुकर लगड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान, या संदर्भात बेलवंडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पडवळ यांना विचारले असता, त्यांनी मात्र बोलण्यास साफ नकार दिलाय. एकीकडे श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथे महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याची घटना घडलेली असताना पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा याच तालुक्यात बेलवंडी पोलिसांनी वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.