खडसेंच्या बालेकिल्ल्यात महाजनांनी सुरेश जैनांना धूळ चारली
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2018 10:00 PM (IST)
वर्षभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी पालिका कर्जमुक्त करण्याचं आणि जळगाव स्वच्छ सुंदर करण्याचं आव्हानही महाजनांना पेलावं लागेल.
जळगाव : सुरेश जैनांची 40 वर्षांची सत्ता उलथवल्याचा जल्लोष जळगावमध्ये सुरु आहे. भाजपने 75 पैकी 57 जागा जिंकल्या. खडसेंच्या बालेकिल्ल्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची जादू चालली. वर्षभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी पालिका कर्जमुक्त करण्याचं आणि जळगाव स्वच्छ सुंदर करण्याचं आव्हानही महाजनांना पेलावं लागेल. पण आम्हाला पाच वर्षासाठी निवडून दिलंय, पण मी एकच वर्ष मागितलंय, असं महाजन म्हणतात. गेल्यावेळी तुरुंगातून निवडणूक जिंकणाऱ्या सुरेश जैनांना जळगावकरांनी हद्दपार केल्याची अनेक कारणं आहेत. जैनांच्या काळात केवळ हुडकोचं कर्ज 700 कोटीच्या घरात पोहोचलं. कचऱ्याच्या प्रश्नानं गंभीर स्वरुप धारण केलं, शहर बकाल होत गेलं अतिक्रमणांनी रस्ते अरुंद होत गेले, खड्ड्यांनी शहराचं कंबरडं मोडलं शहरात हॉकर्सचा प्रश्न गंभीर झाला, भाड्यानं दिलेल्या गाळ्यांचं नूतनीकरण झालं नाही सत्तेत वाटेकरी राहिलेले मनसेचे नगरसेवक आणि महापौर ललित कोल्हे भाजपच्या गळाला लागले घरकुल घोटाळ्या प्रकरणामुळे जैनांची भ्रष्टाचारी नेता म्हणून झालेली इमेज त्यांना पुसता आली नाही