मुंबई: एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse)  डोक्यात मानसिक बिघाड झाला आहे, यांना महसूल चोरीमुळे 137 कोटी रुपये भरावे लागणार आहेत, राजकीय अस्तित्व संपलं आहे आणि त्यांच्याकडे पायात चप्पलही घालायला पैसे राहणार नाहीत असं प्रत्युत्तर राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिलं. गिरीश महाजन यांचे सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेमध्ये काही फोटो दाखवले होते. त्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. 


गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी केले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले की, नऊ वर्षांपूर्वीचा फोटो दाखवून खडसे काय सांगतात? त्यावेळी कुंभमेळा होता, त्या निमित्ताने सर्व धर्मीय लोक उपस्थित होते. त्यावेळी मुस्लिम धर्मातील एका नेत्याच्या मुलाचे लग्न होतं. त्या लग्नाला 20 ते 25 हजार लोक हजर होते. त्या लग्नाला सर्व नेते उपस्थित होते. त्यावेळचा कुठलातरी फोटो दाखवायचा आणि काहीही आरोप करायचं काम सुरू आहे.


या फोटोमध्ये आपल्यासोबत दाऊदचे नातेवाईक असल्याचा आरोप करण्यात आले होते. त्यानंतर याचे सर्व डिटेल्स पोलिसांकडून मागवण्यात आले आणि आरोप चुकीचे असल्याचं स्पष्ट झालं होतं असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. 


राजकीय अस्तित्व संपलं म्हणून पोटात दुखतंय


गिरीश महाजन म्हणाले की, कुठेतरी पोटात दुखतंय, 137 कोटी रुपयांचा दंड, भोसली एमआयडीसी जमीन प्रकरणी 27 कोटी दंड लागला आहे. त्यांची सर्व संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे आता यांच्या पायात चप्पलही घालायला पैसे राहणार नाहीत अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे खडसे बावचाळले आहेत. काही करून आपला सत्यानाश झाला, मग हा कसा वर चालला याचं दुःख त्यांना आहे. 


आपले सलीम कुत्तासोबत कोणतेही संबंध नसल्याचं सांगत गिरीश महाजन म्हणाले की, सलीम कुत्ता हा देशद्रोही आहे. त्यामुळे त्याच्यासोबत नाव जोडून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागे शिवसेना असून त्यांची अवस्था ही ना घर का ना घाट का अशी झाली आहे. 


एकनाथ खडसे यांनी काय आरोप केले? 


गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी केले आहेत. विधानपरिषदेत त्यांचे फोटो दाखवत महाजनांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी खडसेंनी केली आहे. 


गिरीश महाजनांवर आरोप करताना एकनाथ खडसे म्हणाले की, "सलीम कुत्ता यांच्याशी गिरीश महाजन यांचे संबंध आहेत. त्यामुळे यांच्यावर दहशतवाद विरोधी गुन्हे दाखल करावेत. ग्रामविकास मंत्री यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत. जर बडगुजर यांचं नाव घेतलं जातं मग गिरीश महजन यांचं नाव का घ्यायचं नाही? गिरीश महाजन यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. या प्रकरणी एसआयटी चौकशी स्थापन करण्याचे आदेश आपण तत्काळ उपसभापती निलम गोऱ्हे यांनी द्यावेत असे आम्हाला वाटतं. सरकारने तात्काळ कारवाई करावी. बॉम्ब स्फोटाशी सबंधित व्यक्तीशी संबंध असल्याने  गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्यावा."