मुंबई : राज्यात दूध भेसळ करणाऱ्यांना शिक्षा करणारा कायदा लवकरच करणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली. दूध भेसळ प्रकरणातील दोषींना तीन वर्षांचा कारावास होणार आहे.
दूध भेसळीबाबत विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना गिरीश बापट यांनी ही घोषणा केली. सध्या दूध भेसळखोरांना सहा महिन्यांची शिक्षा आहे. मात्र सहा महिन्यांची शिक्षा असल्यामुळे या प्रकरणात लगेच जामीन होतो.
ही शिक्षा तीन वर्षांपर्यंत वाढवली तर आरोपीला जामीन होणार नाही. त्यामुळे तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद असणारा कायदा लवकरच केला जाईल, असं बापट यांनी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं.
दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी अनेक आमदारांनी विधानसभेत केली. मात्र जन्मठेपेची शिक्षा करणारा कायदा आणण्यात अडचणी असल्याचं बापट यांनी यावेळी सांगितलं.
सध्या दूध भेसळीची तपासणी करण्यासाठी राज्यात चार मोबाईल व्हॅन आहेत. मात्र ज्या सातत्याने या व्हॅनद्वारे तपासणी व्हायला हवी, ती होत नसल्याची कबुली बापटांनी दिली. संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत समज देण्यात येईल असंही ते म्हणाले.
यापुढे तपासण्यांमध्ये अधिक सातत्य असेल, अशी ग्वाही यावेळी गिरीश बापट यांनी विधानसभेत दिली. मुंबईत येणाऱ्या दुधाच्या गाड्या तसंच राज्यातील काही भागातील गाड्या अचानक या मोबाईल व्हॅनद्वारे तपासण्यात येतील असंही बापट यांनी सांगितलं.
दूध भेसळखोरांना 3 वर्ष कारावास, लवकरच कायदा : गिरीश बापट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Mar 2018 12:30 PM (IST)
दूध भेसळीबाबत विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना दोषींना तीन वर्षांचा कारावास ठोठवणारा कायदा करणार असल्याची घोषणा गिरीश बापट यांनी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -