सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गझलकार, पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील तळेरे येथे निधन झाले. वाशी येथे झालेल्या 9 व्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्यावर मूळ गावी नानिवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नानिवडेकर यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नानिवडे येथील मधुसूदन नानिवडेकर महाराष्ट्रात गझलकार म्हणून परिचित होते. त्यांच्या अनेक गझला गझलनवाज भीमराव पांचाळे आपल्या कार्यक्रमातून सादर करतात. नानिवडेकर यांच्या अनेक गझलांनी महाराष्ट्राला वेड लावले. चांदणे नदीपात्रात हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला असून त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. या काव्य संग्रहाची निवड पुणे विद्यापीठात संदर्भ ग्रंथ म्हणून झाली आहे. तर पत्रकारितेसाठीही अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. संपुर्ण राज्यभर त्यांनी गझल लेखनाच्या अनेक कार्यशाळा घेतल्या. 

 

मधुसूदन नानिवडेकर यांनी दैनिक पुढारी मध्ये काही काळ उपसंपादक म्हणून काम केले असून सध्या ते महाराष्ट्र टाईम्स चे सिंधुदुर्ग प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. १९७७ साला पासून त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी लिहिलेली ‘ठेव तु मनातल्या मनात’ ही कविता सुरेश भटांच्या निदर्शनास आली आणि ते म्हणाले अरे ही तर गझल आहे, तेव्हापासून ते गझल कडे वळले. तेवढ्याच सशक्तपणे ते गझल लिहिली. नानिवडे गावचे सरपंच म्हणूनही त्यांनी काम केलं

 

संपुर्ण महाराष्ट्रात गझल कार्यक्रमात टाळ्यांच्या कडकडाटात नानिवडेकर यांच्या गझलांना प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्रात विविध ठिकाणी गझल कार्यशाळेत नानिवडेकर मार्गदर्शन करायचे. गझलविश्वात प्रतिष्ठेचा मानला गेलेला युआरएल फाऊंडेशचा 2019 चा गझलगौरव पुरस्कार तसेच गझल लेखनातील कार्याबद्दल टिळक वाचन मन्दिरचा २०२० मधील व्दारकानाथ शेंडे साहित्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग मधील दिवंगत साहित्यिक यांचा परीचय करून देणाऱ्या ‘साहित्य सिंधू’ या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले होते.

 

जसा स्वभाव गोड तशीच त्यांची गझलही गोड होती. त्यांच्या गझलेने प्रत्येकाला आपलेसे केले. परंतु, दिगंताच्या प्रवासाला जाताना कसलिही हरकत न घेता नानिवडेकर आपल्या "निघावयास नानिवडेकर हरकत नाही..." या गझलेप्रमाणे निघूनही गेले. 

 

 

नानिवडेकर यांची शेवटची फेसबुक वरील पोस्ट

 

मी कधी केली न माझ्या 

वेदनांची रोषणाई

मी दिवाळी सोसण्याची

साजरी साधीच केली

 

घावही त्यांनीच केले

दंशही त्यांनीच केले

शेवटी श्रद्धांजलीची

भाषणे त्यांनीच केली

 

गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी गायलेली "भलभलते सांगतेस उगाच भांडतेस" ही गझल प्रसिध्द आहे. या गझलेने त्यांना प्रसिध्दी दिली. अनेक कार्यक्रमातून भीमराव पांचाळे यांनी ही गझल गायली आहे. मधुसूदन नानिवडेकर यांच्या जान्याने नवीन लिहित्या हातांना प्रोत्साहन देणारे आणि नेहमीच पाठबळ देणारे एक उत्साही गुरुतुल्य व्यक्तिमत्व निघून गेले. त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली असल्याच्या प्रतिक्रीया साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर नानिवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.