Panvel Municipal Corporation: पनवेल महानगरपालिकेचा 2021-22 चा स 783 कोटींचा अर्थसंकल्प महासभेसमोर मांडण्यात आला. या अर्थसंकल्पाला महासभेनं मंजूरी दिली. मात्र, सभागृहात मालमत्ता कराबाबत चर्चा केली जात नसल्याने विरोधकांनी महासभेत सभात्याग केलाय.
महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे घेण्यात आली. मागील आठवड्यात स्थायी समितीने अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर हे अर्थसंकल्प महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी यांनी 783 कोटी रुपयांचा वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प महासभेपुढे सादर केला. या अर्थसंकल्पात महानगरपालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला असून मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे यांनी जमा व खर्चाचा अंदाजानूसार अर्थसंकल्पातील ठळक बाबीं सभेपुढे मांडल्या. यावेळी अर्थसंकल्पावरील नगरसेवकांनी आपल्या सूचना मांडल्या. या सूचना येत्या दोन दिवसात लेखी स्वरूपात देण्यात याव्या असे महापौरांनी सांगितलंय. यावेळी मालमत्ता कराच्या रूपात प्राप्त होणारे अंदाजित 200 कोटीं या अर्थसंकल्पात ग्राह्य धरले आहेत.
एकीकडे एलबीटीचे शेकडो कोटी रुपये महानगरपालिका माफ करीत असेल तर मालमत्ता कराबाबत दिलासा देण्याची मागणी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली. सत्ताधारी मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी केला. पीठासीन अधिकारी विरोधकांना बाजु मांडू देत नसल्याने विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. सभागृह बाहेर सत्ताधाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याच दरम्यान शेकाप मधून निवडून आलेले नगरसेवक हरेश केणी आणि नगरसेविका हेमलता गोवारी यांनी सभागृहाच्या कामकाजात विरोधीपक्षाच्या वतीनं सहभाग घेतला.
मत्यव्यवसाय व कृषी विभागासाठी स्वतंत्र हेड निर्माण करा
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अद्यापही शेती तसेच मच्छिमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. या पारंपरिक व्यवसायांना चालना देण्यासाठी पालिकेने याबाबत नवीन हेड तयार करून या व्यवसायांना पालिकेमार्फत अनुदान देण्याबाबत विचार करावा अशी मागणी नगरसेवक हरेश केणी यांनी केलीय. पालिका हद्दीत दिबा पाटील यांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी देखील केणी यांनी यावेळी केली. अर्थसंकल्पात याबाबत तरतूद करावी असं केणी यांनी सांगितलंय.
जमा खर्चाचे अंदाजपत्रक
सभाकामकाज व आस्थापनावरील खर्च - 67.64 कोटी
बांधकाम - 247.23 कोटी
अनुदानातील भांडवली कामे - 58.04 कोटी
इतर - 153.20 कोटी
शहर सफाई - 65.19 कोटी
राखीव निधी - 8.53कोटी
आरोग्य्,शिक्षण व अग्निशमन - 41.73कोटी
पथप्रकाश व उद्याने - 56.41कोटी
जलनिस्सारण व मलनिस्सारण - 29.64 कोटी
पाणीपुरवठा - 55.91कोटी
अखेरची शिल्लक - 0.26 कोटी
एकूण - 783.7कोटी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-