Pandharpur Gautami Patil Dance Performance : सबसे कातिल, गौतमी पाटील... अशी ओळख असणाऱ्या गौतमी पाटीलला (Gautami Patil) अजूनही राज्यभरातून अफाट मागणी होत असताना आता मात्र तिचा कार्यक्रम आणणे आयोजकांना जवळपास चौपट महागात पडणार आहे. याचा फटका आयोजकांसह गौतमी आणि तिच्या चाहत्यांना देखील बसण्याची शक्यता आहे. गौतमीचा कार्यक्रम आणि चाहत्यांची हुल्लडबाजी हे जणू समीकरणच झाले आहे. यात कधी प्रेक्षकांमध्ये हाणामारी होते तर कधी पोलिसांना या हुल्लडबाजांवर काठ्या चालवाव्या लागतात. अशातच परवा या हुल्लडबाजांचा फटका प्रसारमाध्यमांच्या कॅमेरामॅनलाही सोसावा लागला. यामुळेच आता पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमांना सर्व परवानग्या सोबत पेड पोलीस बंदोबस्त देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याच पेड बंदोबस्तामुळे आयोजकांच्या खिशाला जवळपास चौपट कात्री लागणार आहे.
गौतमी पाटीलच्या अदा पडणार महागात
याची सुरुवात सांगोला तालुक्यातील घेरडी या गावातील कार्यक्रमापासून सुरु झाल्याने या आयोजकांना 100 पोलीस कर्मचारी आणि सहा अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी तब्बल सव्वा पाच लाख रुपये भरून गौतमीचा कार्यक्रम ठेवावा लागला आहे. मात्र यामुळे गौतमीचा कार्यक्रम शांततेत होत असून आमच्या कार्यक्रमाला 25 टक्के महिला आल्याने त्यांनाही कार्यक्रम बघता आल्याचे आयोजकांनी सांगितलं. घेरडी येथे रासपचे नेते आबा मोठे यांच्या वाढदिवसासाठी गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होतं. अगदी आपल्या सहकार्याला शुभेच्छा देण्यासाठी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे देखील उपस्थित होते. दरम्यान, आता गौतमीच्या मानधनाच्या दुपटीपेक्षाही जास्त रक्कम केवळ पोलीस बंदोबस्तासाठी भरावी लागणार असल्याने सर्वच आयोजकांना एवढा खर्च करणे कितपत शक्य आहे याची जाणीव गौतमीला देखील आहे. त्यामुळेच तुम्ही कार्यक्रमासाठी दुरून येत तर शांतपणे कार्यक्रम पाहा आणि आनंद घ्या, असं आवाहन गौतमीला आपल्या चाहत्यांना केले आहे.
गौतमीच्या डान्ससाठी आता आयोजकांच्या खिशाला चौपट कात्री
सध्या गौतमी पाटीलची महाराष्ट्रात खूप मोठी क्रेझ आहे. गौतमी म्हणजे तुफानी गर्दी हे जणू समीकरणच बनल्याने राजकीय नेते असोत अथवा इतर कुणीही, गर्दी जमविण्यासाठी गौतमी इतका हुकुमाचा एक्का दुसरा नसल्याची जाणीव त्यांना आहे. मात्र आता गौतमी आणि तिच्या टीमचे मानधन, तिच्या व्हॅनिटी व्हॅनचा खर्च, कार्यक्रमाचा गेले लठ्ठ खर्च याच्यासोबत आता पोलीस बंदोबस्तासाठीचा लाखो रुपयाचा खर्च वाढल्याने गौतमीचे कार्यक्रम आता केवळ बडे आयोजकांच्या खिशाला परवडू शकणार आहेत. त्यामुळे गौतमी आणि तिच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच कडू बातमी ठरणार आहे. अर्थात हे सर्व घडले तेही गौतमीच्या कातिल अदा आणि चाहत्यांचा राडा यामुळे आता याचा फटका खुद्द गौतमीसह आयोजक आणि चाहत्यांनाही सोसावा लागणार आहे. यामुळे भविष्यात गौतमीचे कार्यक्रमांना मागणी कमी झाली तर त्याचा दोष देखील या सर्वांचाच असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :