मुंबई: केंद्र सरकारच्या सरकारी संस्थांमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली, बेरोजगार तरुणांना लाखोचा गंडा घालणाऱ्या सराईत आरोपीला उत्तन सागरी पोलीसांनी अटक केली आहे. आरोपीने नोकरीला उत्तन सागरी पोलीस ठाणे आणि नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार ते पाच तरुणांची लाखोची फसवणूक केली आहे. आपण पंतप्रधान कार्यालयात नोकरी करत असून, उच्च सरकारी नोकरी लावण्याच्या नावाखाली हा आरोपी बेरोजगार तरुणांकडून लाखोची रक्कम घेत होता.  


अजितकुमार सुनील डे असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. हा आरोपी बेरोजगार तरुणांना हेरुन, त्यांना नोकरीचं आमिष दाखवायचा. आपण पंतप्रधान कार्यालयात नोकरी करत असल्याचं तो सांगायचा. केंद्र सरकारच्या  DRDO कार्यालय, रेल्वे, अणुऊर्जा प्रकल्प इत्यादी कार्यालयात उच्च पदावर नोकरी लावण्याच्या नावाखाली आरोपीने बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये घेतले होते. या आरोपीने नोकरी लागल्याची बोगस कागदपत्रही तरुणांना दिली होती. मात्र त्याची ही हेराफेरी फसली आणि फसलेल्या तरुणांनी पोलीस ठाण्यातच याची तक्रार केली. 


उत्तन सागरी पोलीस ठाणे आणि नवघर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन याला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. अजितकुमार डे हा मुळचा दिल्ली येथील राहणार असून, तो सध्या काशिमीरा येथे राहतो. आरोपी हा बेरोजगार तरुणांना हेरायचा आणि चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून पैसे घ्यायचा. आरोपीने उत्तन सागरी पोलीस ठाण्यात एका तक्रारदारकडून आणि त्याच्या मित्राकडून एकूण 53 लाख घेतले आहेत. तर नवघर पोलीस ठाण्यातील एका तक्रारदाराकडून 13 लाख 50 हजार रुपये घेतले आहेत. 


आता फक्त चार ते पाच केस समोर आल्या असून या आरोपीने आणखी अनेक तरुणांना फसवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नोकरीच्या आमिषाने त्याने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. 


आरोपी हा सराईत आरोपी असून त्याने या अगोदर औरंगाबाद आणि गुजरात येथेही अशीच फसवणूक केल्याच निष्पन्न झालं आहे.  या आरोपीने आणखीन कुणाकुणाला फसवलं याचा तपास आता पोलीस करत आहेत. फसवलेल्या नागरिकांनी समोर यावं आणि तक्रार नोंदवावी असं आवाहन यावेळी पोलिसांनी केलं आहे. तसेच अशा प्रकारच्या आमिषाला बळी न पडण्याचं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. 


ही बातमी वाचा: