Gaur Gopal Das: धकाधकीच्या आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरे जात जबाबदारी पूर्ण करणारे बहुतांशी जण आहेत. तर, त्याच वेळेस या आयुष्याशी फारकत घेत संन्यासी होत अध्यात्माच्या मार्गाने स्वत: सह इतरांचे आयुष्य चांगले करण्यासाठी काहीजण प्रयत्न करतात. यामध्ये उच्चशिक्षित आणि चांगली नोकरी करणाऱ्यांचा समावेश आहे. त्यावरून अनेकदा चर्चा झडत असतात. यातील सुंदर आयुष्य कोणते, यावर प्रेरक व्याख्याते गौर गोपाल दास (Gaur Gopal Das) यांनी नेमकं भाष्य केले आहे. एबीपी माझा कट्ट्यावर बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. 


रोजच्या जगण्यातील अनुकूलता-प्रतिकूलता यातील अनुकूलता शोधणे आणि आयुष्य सुंदर करणे हे योग्य नाही का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर गौर गोपाल दास यांनी म्हटले की, जगामध्ये राहून आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत, अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात, त्यातील अनुकूल परिस्थितीत आनंदाचा शोध घेणे हे खरं आयुष्य आहे. महाभारत, गीतेचे आयुष्य आहे. संन्यास घेणे, आयुष्य सोडून देणे हे गीतेचे अथवा महाभारताचे आयुष्य नसल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, तुम्ही हे का केले असा प्रश्न मला विचारला जाईल असे सांगत त्यांनी म्हटले की, यातील माझ्या दोन भूमिका आहेत. एखाद्या इंजिनिअरिंगच्या वर्गातील 50 पैकी 49 विद्यार्थी हे कॉर्पोरेट जगतात प्रवेश करतात. नोकरी, व्यवसाय सुरू करतात. अगदी सामान्य आयुष्य जगतात. मात्र, त्यातील एक टक्का अथवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी प्राध्यापक होतात, शिक्षण क्षेत्रात प्रवेश करतात. मी अथवा माझ्यासारख्या काहींनी हे आयुष्य निवडले आहे, त्याला कारणदेखील आहे. प्राध्यापक होणारे विद्यार्थी आपल्याकडील ज्ञान इतरांना देतात. ज्ञान वाटतात, त्याचा प्रसार करतात. आम्हीदेखील तेच करतो. पार्ट टाइम शिक्षकी पेशातून ज्ञान प्रसार करता येऊ शकत नाही. ज्ञान प्रचार करण्यासाठी हे आयुष्य निवडले असल्याचे गौर गोपाल दास यांनी सांगितले. 


आपल्या अध्यात्मिक आयुष्याच्या निवडीबाबत दुसरे कारण सांगताना, त्यांनी म्हटले की,  प्रेमात बुडालेली व्यक्ती वेडी होते, तसेच वेड मला वेड लागले होते. प्रेमात पडलेल्या व्यक्तीचे आपल्या जोडीदारावरील प्रेम ओसंडून वाहून जाते. तसेच माझ्याबाबतीत झाले असल्याचे त्यांनी म्हटले. प्रेमात पडलेली व्यक्ती झोकून देते. मलादेखील मी निवडलेल्या मार्गावर प्रेम झाले आहे. मी स्विकारलेला मार्ग हीच माझी प्रेयसी असल्याचे त्यांनी सांगितले. 


हाच खरा मोक्षाचा मार्ग


अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाणे प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग शोधणे, त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मार्ग शोधणे, आनंद शोधणे, सुख शोधणे हाच खरा मार्ग आहे, हाच संन्यासाचा मार्ग आहे, हाच मोक्षाचा मार्ग आहे, असे गौर गोपाल दास यांनी म्हटले.  


गौर गोपाल दास हे देखील उच्चशिक्षित, इंजिनियर असून त्यांनी अध्यात्माच्या क्षेत्रात स्थान निर्माण केले आहे. सुखवस्तू आयुष्य, चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला. गौर गोपाल दास हे इस्कॉनशी संबंधित आहेत. भारतीय जीवनशैलीचे प्रेरक वक्ते आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



पाहा व्हिडिओ: Gaur Gopal Das on Majha Katta : खरा मोक्षाचा मार्ग कोणता? जाणून घ्या गौर गोपाल दास यांच्याकडून...