राज्याची भरभराट होऊ दे, मुख्यमंत्र्यांचं बाप्पाला साकडं
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2016 07:58 AM (IST)
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते यावेळी पूजा पार पडली. यावेळी राज्याच्या भरभराटीची मनोकामना मुख्यमंत्र्यांनी बाप्पाच्या चरणी केली. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायनाद्वारे बाप्पाची आराधना केली. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबईतील रॉयल स्टोन निवासस्थानीही गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पंकजा मुंडें यांनी पती अमित पालवेंसह गणरायाची पूजा केली. महाराष्ट्रातील महिला सुरक्षित रहाव्यात, असं साकडं यावेळी पंकजांनी गणरायाला घातलं. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या घरीही बाप्पाचं आगमन होतंय. ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत बाप्पा शिक्षण मंत्र्याच्या घरी दाखल झाला. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या मुंबईतल्या घरातही गणरायाची स्थापना करण्यात आली. सहकुटुंब गणेश मूर्तीची पूजा करुन त्यांनी बाप्पांना विराजमान केलं. राणेंच्या कोकणातील घरीही गणपती असतो. मात्र यंदा नातवाच्या आग्रहास्तव मुंबईतील घरीही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.