गोंदिया : चक्क मोटारसायकलवरुन 80 किलो गांजाची तस्करी करणाऱ्या तरुणाला गोंदियातील सालेकसा पोलिसांनी अटक केली आहे. या गांजाची किंमत 12 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोंदियामार्गे छत्तीसगडमधून उत्तर प्रदेशात या गांजाची तस्करी केली जात होती. गौतम नरेश चौहान असं या तरुणाचं नाव गांजाच्या तस्करीसाठी तो तब्बल 800 किमी अंतर बाईकवरुन पार करणार होता.


गोंदिया जिल्ह्याच्या सीमेलाच लागून मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्याच्या सीमा आहेत. या मार्गावर अनेक नागरिक जा-ये करत असतात. होळी आणि धुलिवंदन सणाच्या निमित्ताने पोलीस विभाग सतर्क होतं. यावेळी एका मोटारसायकलवर तरुण संशयितरित्या आढळला असता सालेकसा पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. सालेकसा आमगाव मार्गावरील झालिया गावाजवळ अडवत त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 80 किलो गांजा आढळून आला. हा गांजा छत्तीसगड राज्याच्या जगदलपूर वरुन उत्तर प्रदेशातील नोएडा इथे नेत असल्याचं त्याने सांगितलं. 


80 किलो गांजा मोटारसायकलवर घेऊन तो जगदलपूर ते नोएडा हे तब्बल 800 किलोमीटर अंतर पार करणार होता. परंतु संशय आल्याने सालेकसा पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान गांजाचे मोठं रॅकेट उघळकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या गांजाची बाजार किंमत 12 लाख रुपये असून त्याच्याकडून मोटारसायकल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. सालेकसा पोलीस पुढील तपास करत आहेत.


सोलापुरात गोवा बनावटीचा 66 लाख 76 लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त
होळी आणि धुलीवंदनच्या पार्श्वभूमीवर सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कामगिरी केली आहे. गोवा बनावटीचा तब्बल 66 लाख 76 लाखाचा विदेशी मद्यसाठा पकडला. गोव्यावरुन सोलापूरमध्ये कंटेनरद्वारे येणाऱ्या 890 मद्य पेट्यांसह एकूण 76 लाख 82 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सांगोला तालुक्यातील सोनंद गावजवळ हा विदेशी मद्याचा साठा पकडला. या कारवाईत कंटेनर चालक ज्ञानेश्वर भोसले याला अटक केली असून मुख्य आरोपी बापू उर्फ सोमनाथ भोसलेसह इतर तीन आरोपी पसार झाले आहेत. या विदेशी मद्याची निर्मिती गोव्यात झाली असून महाराष्ट्रात या मद्य विक्रीला बंदी आहे.