धुळे : धुळे शहरात कुख्यात गुंड गुड्ड्याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. कराचीवाला चौकातील गोपाल टीसमोर आज पहाटे साडेपाच ते साडेसहाच्या सुमारास ही थरारक घटना घडली.
शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. टोळी युद्धातून ही हत्या झाल्याचं म्हटलं जात आहे. गु्ड्ड्याचा खून करुन मारेकऱ्यांनी पोबारा केला. हत्या झाल्यानंतर घटनास्थळी काही काडतुसंही आढळून आली आहेत.
गुंड गुड्ड्यावर धुळ्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तीन दिवसांपूर्वीच गुड्ड्या पोलिस कोठडीत होता. मात्र आज पहाटे त्याचा गोळ्या झाडून खून झाला.
दरम्यान, परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या माध्यमातून या खुनाचे धागेदोरे पोलिसांना गवसले आहेत. मृतदेह पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवण्यात आला असून लवकरच मारेकऱ्यांना अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.