व्हॉट्सअॅपमुळे सांगलीतील अट्टल गुन्हेगार जेरबंद
एबीपी माझा वेब टीम | 12 May 2018 06:57 PM (IST)
गेली ७ वर्षे फरार असलेल्या सांगली जिल्ह्यातील एका अट्टल गुन्हेगाराला व्हॉट्सअॅपमुळे अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
पंढरपूर : गेली ७ वर्षे फरार असलेल्या सांगली जिल्ह्यातील एका अट्टल गुन्हेगाराला व्हॉट्सअॅपमुळे अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सांगली जिल्ह्यातील खुनासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात २०१० पासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार भाऊसो पाटील हा दर एकादशीला पंढरपुरात यायचा. यासाठी सांगली पोलिसांना अनेकदा एकादशीचा मुहूर्त साधून सापळाही रचला होता. मात्र प्रत्येकवेळी तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, काल (शुक्रवार) व्हॉट्सअॅपवरील फोटोवरुन पंढरपूर शहरचे पोलीस हवालदार हणमंत देशमुख यांनी त्याला जेरबंद केलं. शहरातील अर्बन बॅंक परिसरात काल सकाळी हवालदार देशमुख साध्या वेशात एटीएममधून पैसे काढण्यासाठी आले असता त्यांना आरोपी भाऊसो पाटील नजरेस पडला. काही दिवसांपूर्वी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एका फरार आरोपीचा फोटो आणि गुन्ह्याबाबतची माहिती आली होती. त्यामुळे देशमुख यांनी तात्काळ आपलं व्हॉट्सअॅप पाहिलं. याबाबत खात्री होताच त्यांनी आरोपीकडे मोर्चा वळवला. पण त्याआधीच आरोपीनं तिथून पळ काढला. यावेळी हवालदार देशमुख यांनी त्याचा पाठलाग करत तात्काळ त्याला अटक केली. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलिसांना त्याला आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला सांगली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. तीन खुनाच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या सात वर्षांपासून भाऊसो पाटील हा फरार होता . सांगली पोलिसांनी भाऊसो पाटील याचा फोटो आणि त्याच्या गुन्ह्याची माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केली होती. हीच पोस्ट पंढरपूरचे हवालदार हणमंत देशमुख यांनीही आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाहिली होती. त्याच्याच मदतीने या अट्टल आरोपीस अटक करणं शक्य झालं.