नागपूर : विदर्भात तापमानाचा पारा 47 अंशावर पोहोचला आहे. या अशा उन्हात बैलाला गाडीला जुंपून त्यांच्याकडून मालवाहतूक करुन घेणाऱ्या दोघांवर नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीपल फॉर अॅनिमल्सच्या सचिव करिष्मा गिलानी यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.


करिष्मा गिलानी काल दुपारी नागपुरातून जात असताना आर मशिनवाल्यांचे लाकडे वाहून नेणाऱ्या बैलगाड्या दिसल्या. हिट वेव्ह असताना वेळ भर दुपारची एक वाजताची होती. भरउन्हात या बैलांच्या खांद्यावर भलं मोठं ओझं देण्यात आल्याचं पाहून करिष्मा गिलानी यांनी 100 क्रमांकावर फोन लावला आणि पोलिसात तक्रार दिली.

कोणती जनावरे किती माल वाहू शकतात, याबाबत कायदा आहे. या कायद्यानुसार जिथे तापमान 37 डिग्रीच्या वर असेल, तिथे दुपारी 12 ते 3 या वेळेत जनावरांचा मालवाहतुकीसाठी वापर करण्यावर बंदी आहे. मात्र हा नियम आपल्याला माहित नसल्याचं फगोराव दुर्गे आणि शेख सलील शेख युसूफ या दोन बैलगाडीमालकांचं म्हणणं आहे.

गिलानी यांनी केलेली तक्रार जनावरांचा मेहनतीच्या कामासाठी वापर करुन घेणाऱ्यांसाठी डोळे उघडायला लावणारी आहे. ज्या उन्हात आपल्याला घराच्या बाहेरही निघावं वाटत नाही, तिथे बैलांना मालवाहतुकीसाठी जुंपलं जातं. त्यामुळे प्राण्यांविषयी देखील संवेदनशीलता जपणं गरजेचं आहे.