पीडित मुलगी एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करत होती. त्याच दुकानाच्या मालकानं या मुलीवर बलात्कार केला आहे. घरातून भोपाळला कुटुंबासोबत फिरायला जातोय म्हणत दुकानदारानं मुलीला फूस लावली आणि चार दिवस आमदार निवासात बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी ज्वेलर्स मालक मनोज भगत आणि रजत मदरे या दोघांना अटक केली आहे.
या प्रकरणामुळे आमदार निवासाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे शासनानं लक्ष द्यावं अशी मागणी आता जोर धरत आहे. खरं पाहायला गेलं तर आमदार निवासात आमदार कधीच राहत नाही. त्यांचे कार्यकर्ते कायम या ठिकाणी राहतात. त्यामुळे आता आमदार निवासाबाबत काही नियमावली देखील तयार करण्यात यावी अशीही मागणी होत आहे.
दरम्यान, याप्रकरणी शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दलही प्रश्न उपस्थित केला आहे. ‘आमदार निवासात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे अशा ठिकाणी एका अल्पवयीन मुलीला नेलंच कसं?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.