मुंबई : येत्या आठवड्याभरात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले नेते विजयकुमार गावित यांना संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


विशेष म्हणजे विजयकुमार गावित हे राष्ट्रवादीचं सरकार असताना आदिवासी विकास मंत्री होते. त्यांनी मुलांच्या साहित्य खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप खुद्द भाजपच्या नेत्यांनीच केला होता. मात्र आरोपींना निवडणुकीत तिकीट देऊन पवित्र करण्याचा प्रकार कॅबिनेट विस्तारातही कायम राहण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या तोंडावर विजयकुमार गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मुलगी हीना गावितला नंदुरबारमधून लोकसभेवरही पाठवलं.
सत्तेसाठी पाचपुते, विजयकुमार गावितांना भाजपत प्रवेश, फडणवीसांचं लंगडं समर्थन

आम्हाला सत्तेवर येऊन बदल घडवायचा आहे. त्यामुळेच विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांना भाजपत प्रवेश दिला, असं लंगडं समर्थन, भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 29 सप्टेंबर 2014 रोजी 'माझा कट्टा'वर दिलं होतं.

विजयकुमार गावितांवर घोटाळ्याचे आरोप आम्ही केले नाहीत. पाचपुतेंवर आम्ही केले. मात्र आमचं सरकार आलं, तरी त्यांची चौकशी कायम राहिल. त्यामध्ये ते दोषी ठरले, तर त्यांच्यावर जरूर कारवाई होईल, असंही फडणवीस त्यावेळी म्हणाले होते.

यापूर्वी 8 जुलै 2016 रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाजपच्या 7, शिवसेनेच्या 2 आणि मित्रपक्षांच्या 2 जणांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली होती.

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला गृहराज्यमंत्रीपद


बुलडाण्याचे पांडुरंग फुंडकर, शिंदखेडाचे जयकुमार रावल, निलंग्याचे संभाजी पाटील निलंगेकर, सोलापूरचे सुभाष देशमुख आणि राम शिंदे यांनी गेल्यावेळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनाही कॅबिनट मंत्रिपद देत मुख्यमंत्र्यांनी सुखद धक्का दिला होता.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची स्वप्नपूर्ती करण्यात आली होती. जानकरांना पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्रालय देण्यात आलं.

याशिवाय शिवसेनेचे जालनाचे आमदार अर्जुन खोतकर आणि जळगावचे आमदार गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय यवतमाळमधील भाजपचे आमदार मदन येरावार आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनाही राज्यमंत्रिपद मिळाली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनीही राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

शिवसेनेच्या अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. कॅबिनेटपदी प्रमोशन मिळालेल्या राम शिंदे यांनी जलसंधारण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला.

मंत्रिमंडळ विस्तारात राम शिंदे यांची गृहराज्य मंत्रीपदावरुन कॅबिनेटपदी वर्णी लागली. यावेळी त्यांना पंकजा मुंडेंकडून काढून घेण्यात आलेलं जलसंधारण खातं देण्यात आलं.