नागपूर : एका 23 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी बलात्काराचा प्रयत्न करून तिला गंभीररित्या जखमी केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये घडली. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे. या तरुणीवर नागपुरातील खाजगी रुग्णालयात सहा तास शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तिच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मार लागल्याने प्रकृती खालावली आहे.
उमरेड तालुक्यातील वेस्टर्न कोल्फिल्ड्स लिमिटेड (WCL) च्या गोकुळ कोळसा खाणीत काल दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान ही घटना घडली. पीडित तरुणी गोकुळ कोळसा खाणीत वजन काट्यावर कार्यरत होती. त्या कार्यालयात महिलांना लघुशंकेसाठी योग्य जागा नसल्यामुळे ती तरुणी दुपारी एकच्या सुमारास लघुशंकेसाठी परिसरातील झुडुपात गेली.
त्यावेळी कोळसा खाणीत आलेल्या चार ट्रक चालकांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यांचे प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे त्यांनी तरुणीच्या डोक्यावर जड दगडांनी जोरदार वार केले. त्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली, अशी माहिती आहे.
सुरुवातीला पीडितेला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिची अवस्था गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी नागपूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या मते तिची प्रकृती गंभीर आहे.
घटनेचं गांभीर्य लक्षात घेत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संध्याकाळी रुग्णालयात जाऊन तरुणीच्या प्रकृतीची विचारपूस केली. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरु आहे.
नागपुरात 23 वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न, पीडितेची प्रकृती गंभीर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Aug 2018 10:06 PM (IST)
या तरुणीवर नागपुरातील खाजगी रुग्णालयात सहा तास शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तिच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मार लागल्याने तिची प्रकृती गंभीर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -