मुंबई : महाराष्ट्राच्या लालपरीचे विघ्न दूर करण्यासाठी अखेर विघ्नहर्ता धावून आल्याचे दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav 2022) कोकणात (Konkan) जाण्यासाठी यंदा दीड लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात रवाना होणार आहेत. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सुमारे 3414 गाड्या फुल झाल्या आहेत. यापैकी 1951 गाड्यांना ग्रुप बुकिेंगचे प्राधान्य मिळाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. 


गणेशोत्सव हा कोकणातील महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो. गणपती व कोकणातील चाकरमान्यांचे एक अतुट नाते बनले आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर यंदा मोठ्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणकडे रवाना होत आहेत. गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांचे नियोजन करते. यंदा महामंडळाने गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे येथून 2500 गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. 


 चाकरमान्यांनी सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या जादा गाड्यांना पसंती दिल्याने सुमारे दीड लाखांहून अधिक चाकरमानी प्रवास करणार आहेत.  कोविड संकटामुळे मोडलेले आर्थिक कंबरडे त्यापाठोपाठ एसटी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे अडचणीत असणाऱ्या महाराष्ट्राच्या लालपरीचे विघ्न दूर अखेर विघ्नहर्ता धावून आल्याचे दिसत आहे.


दरम्यान, गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा वाहतुकीची सेवा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महामंडळाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फिरती गस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरूस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत.