मुंबई : कोरोनाच्या (Coronavirus)  दोन निर्बधानंतर यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) जल्लोषात साजरा होणार आहे. त्यामुळे राज्याच्या पर्यटन विभाग आणि स्थानिक महापालिकेने संयुक्तपणे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शन यात्रेचे आयोजन केलंय. 1, 2, 5,  6 आणि 7 सप्टेंबर या पाच दिवशी यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. 


कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे. राज्यभरातील गणेशोत्सव मंडळे आपापल्या परिसरात नयनरम्य देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम आदी माध्यमातून अतिशय उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करतात. कोरोना महामारीदरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यावर देखील स्वाभाविक मर्यादा आल्या होत्या. परंतु दोन वर्षांनंतर प्रथमच राज्यभरात मोठ्या उत्साहात व निर्बंधरहित वातावरणात गणेशोत्सवाचे आयोजन होणार आहे.


राज्याच्या पर्यटन विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शहरांतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व गणेश मंदिरांची यात्रा घडविली जाणार आहे. यासाठी बृहन्मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर महानगरपालिकेकडून वातानुकूलित बसेस, आरोग्यसेवक, गाईड आणि नाश्ता या सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच सर्व मंडळे आणि मंदिरात गणपती दर्शनासाठी थेट प्रवेश दिला जाईल. 


अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी नागरिकांनी पर्यटन महासंचालनालयाच्या खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्याच आले आहे.


मुंबई : सुहास 7738694117 
ठाणे : प्रशांत 9029581601 / कल्याणी 7030780802
पुणे : अजय 7887399217 / पुजारी 8888363647
नागपूर : पंकज 9665852021 / रजनी 9764481913