मुंबई : कोकणातील गणेशोत्सवाची लगबग ही सर्वांच्या परिचयाची आहेच. त्याच पार्श्वभूमीवर गणोशोत्सवासाठी मुंबईहून (Mumbai) कोकणात (Kokan) जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिंदे गटाकडून मोफत एसटी (ST) प्रवास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभेतून 12 ते 18 मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत. शनिवार (20 ऑगस्ट) रोजी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये यासंदर्भात बैठक पार पडली. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. दरवर्षी मुंबई गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 


कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी करावी लागते कसरत


मुंबईत स्थायिक असलेल्या प्रत्येक कोकणवासीयांची लगबग सुरु असते. रेल्वे आणि एसटीचे सहा महिने आधी बुकिंग बरेच जण करतात. त्यामुळे एसटी आणि रेल्वेचं आयत्यावेळी बुकिंग मिळणं हे कठिण होऊन होतं. त्यामुळे कोकणवासीयांसाठी कोकणात जाणं सुलभ व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्यांना बुकिंग मिळालं नाही किंवा ज्यांच्याकडे जाण्याची काही सोय नाही अशा लोकांसाठी ही व्यवस्था शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. यामुळे कोकणातील चाकरमानी आता खुश होणार यामध्ये शंका नाही. 


बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित


मुख्यमंत्री शिंदे यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडली आहे. या बैठकीला मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. या नेत्यांसोबतच पक्षाचे इतर पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते. तसेच याच बैठकीमध्ये या निर्णयावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि या निर्णयावर शिक्कमोर्तब करण्यात आलं आहे. 


ऑनलाईन बुकिंवर अद्याप निर्णय नाही


यामध्ये अद्याप ऑनलाईन बुकिंवर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे सुरुवातील कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन बुकिंग नसणार आहे. तसेच या सुविधेसाठी मिळणारा प्रतिसाद पाहून ऑनलाईन बुकिंवर निर्णय घेण्यात येणार आहे. कोकणातील एक मोठा वर्ग मुंबईत स्थित आहे. त्यामुळे मतदार म्हणून हा वर्ग राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा असतो. 


कोल्हापूर मार्गे जाण्याऱ्यांसाठी टोलमाफी 


मुंबई गोवा महामार्गावरील  वाहतूक  कोंडी ताण कमी करण्यासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर मार्गी गेल्यास मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि इतर टोल नाक्यांवरील 600 ते 700 रुपयांचा टोल माफ होणार आहे. यासाठी मुंबई शहरासोबत पालघर येथील नागरिकांना जवळच्या पोलीस स्थानकातून आरटीओकडून पास उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mumbai Goa Highway : रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेची पदयात्रा; अमित ठाकरे करणार यात्रेचं नेतृत्व