लातूर : लातूरमधील दुष्काळ यंदाच्या गणपती विसर्जनावर विघ्न म्हणून समोर आला आहे. कारण, गणपती मूर्ती विसर्जित करण्यासाठी लातूर शहरात यंदा पाणीच नाही. जिल्ह्यातील सर्व नदी-नाले, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती कुठे विसर्जित करणार, हा प्रश्न लातूरमधील मंडळांसोबतच नागरिकांनाही पडला आहे. त्यावर उपाय म्हणून यंदा गणेशमूर्ती विसर्जित न करता, दान करा, अशी विनंती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गणेश मंडळं आणि लातूरकरांना केली आहे. लातूरमध्ये सप्टेंबर अखेर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे लातूरकरांना पुन्हा एकदा मोठ्या पाणीसंकटाला सामोरं जावं लागणार आहे.
लातूर जिल्ह्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाण्याची प्रचंड टंचाई आहे. यासंदर्भात लातूर शहरात शांतता कमिटीची बैठक झाली. या बैठकीला लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांच्यासह शहरातील अनेक गणेशमंडळाचे पदाधिकारी हजर होते. या सर्व जणांसमोर एकच प्रश्न होता की, यावर्षी गणेश विसर्जन कुठे आणि कसे करावे? यावर तोडगा काढत मोठ्या गणेश मंडळाचे गणेशमूर्ती ह्या विसर्जित न करता दान करण्यात येणार आहेत.
मोठ्या गणेशमूर्ती त्याच बरोबर मानाचे गणेशमूर्ती ह्या लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात ठेवण्यात येणार आहेत. पाणी नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तरी गणेश मंडळाने सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लातूरमध्ये हे केले आहेत उपाय
गणेशमूर्ती मंदिरात ठेवणे
गणेशमूर्ती दान करणे
मंडळाकडे जागा असल्यास जतन करून ठवणे
घरगुती गणेशमूर्ती घरातच पाण्यात विसर्जन करणे
Ganesh Visarjan | लातूरमध्ये गणेश विसर्जन नाही तर गणेशमूर्तीचे दान, पाणी टंचाईमुळे निर्णय
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
12 Sep 2019 05:31 PM (IST)
लातूरमध्ये सप्टेंबर अखेर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे लातूरकरांना पुन्हा एकदा मोठ्या पाणीसंकटाला सामोरं जावं लागणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -