मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादन करण्यासाठी प्रसिध्द असलेला हा मतदारसंघ आहे. 1936 मध्ये काँग्रेसचे अधिवेशन याच मतदारसंघातील फैजपूर येथे झाले असल्याने काँग्रेसच्या इतिहासाची पार्श्वभूमी या मतदारसंघास लाभली आहे. 2009 च्या पुनरर्चनेत यावल मतदारसंघातील काही गावे या मतदारसंघास जोडली गेली. 1962 ते 1990 पर्यंत मधुकरराव चौधरींचा या मतदारसंघात दबदबा होता. त्यानंतर 1995 पासून भाजपने या मतदारसंघावर वर्चस्व मिळवले.

हे ही वाचा -पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघ : विरोधात आमदार देण्याची परंपरा

2009 मध्ये शिरीष मधुकरराव चौधरी हे अपक्ष म्हणून या मतदारसंघातून निवडून आले असले तरी 2014 मध्ये भाजपाचे हरीभाऊ जावळे यांचेकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. हरीभाऊ जावळे यांची मतदारसंघावर घट्ट पकड आहे. यामुळे आज या मतदारसंघात भाजप अत्यंत सुस्थितीत आहे.  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे सातपुड्यातील वाड्यावस्त्यांपर्यंत पोहचल्या असून यांची देखील या मतदारसंघावर चांगलीच पकड असल्याचे दिसून आले. त्याचा देखील फायदा हा  भाजपा उमेदवाराला होईल.
हे ही वाचा - जामनेर विधानसभा मतदारसंघ : गिरीश महाजन यांचे एकहाती वर्चस्व
विदयमान आमदार हरीभाऊ जावळे हेच परत उमेदवार असण्याची शक्यता आहे. मध्यंतरी एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे - खेवलकर  यांच्या नावाची चर्चा होती पण आता ती मागे पडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपातही रावेर मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे गेलेली आहे. काँग्रेसने या मतदारसंघात पाय रोवण्यासाठी कोणतेही जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाही. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रेला देखील या मतदारसंघात प्रतिसाद न मिळाल्याने प्रदेशचे काँग्रेस नेते हताश झाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपली ताकद नसतांना उमेदवार देऊन आपले हसे करून घेतले होते.

हे ही वाचा -पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघ : विरोधात आमदार देण्याची परंपरा

खरंतर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हा नावापुरता राहीला असून त्यांचे संघटनच नसल्याने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला फार मोठ्या पराभवाला सातत्याने सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत काँग्रेस विधानसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघात भाजपाला सामोरे जाणार असून काँग्रेसकडून माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी हेच उमेदवार असतील. बहुजन वंचित आघाडीदेखील आपला उमेदवार देण्याची शक्यता असली तरी ती निकालावर परिणाम करू शकण्याइतपत त्यांची ताकद नसेल.
हे ही वाचा - भुसावळ विधानसभा मतदारसंघ | भाजपचे वर्चस्व कोण मोडीत काढणार?