राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक सज्ज
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2017 07:45 AM (IST)
पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणत राज्यभरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सुरुवात होत आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई- पुण्यासह राज्यभर जोरदार तयारी सुरु आहे.
मुंबई: पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणत राज्यभरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सुरुवात होत आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई- पुण्यासह राज्यभर जोरदार तयारी सुरु आहे. मुंबईत पोलीस आणि महापालिकेकडून गणपती विसर्जनासाठी चौपाट्या सज्ज करण्यात आल्या आहेत. मुंबईत तब्बल 40 हजार पोलीस विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात करण्यात आले आहेत. मुंबईत शंभर ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. तसंच अनेक रस्त्यांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे तर काही रस्त्यांवरची वाहतूक वळवण्यात येणार आहे. मुंबईत बाप्पांच्या निरोपाची तयारी
मुंबईत शंभर ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय
69 नैसर्गिक स्थळांवर तर 31 कृत्रीम तलावांचा समावेश आहे
वाहतूक पोलिसांचे 3 हजार 500 अधिकारी-कर्मचारी सज्ज आहेत. त्याचबरोबर 500 ट्रॅफिक वॉर्डन तयार
मुंबईत सुमारे 2 लाख घरगुती गणपती तर 11 हजार 500 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.
रुग्णवाहिकांची संख्या 60 तर 201 निर्माल्य कलश ठेवण्यात आलेत.
एकूण 3404 बसगाड्यांपैकी 1687 बसगाड्यांच्या मार्गात बदल
मुंबई महापालिकेचे साडेसात हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात
पोलीस आयुक्तांकडून विसर्जन तयारीची पाहणी मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी गणपती विसर्जनाच्या तयारीची पाहणी केली. गिरगाव चौपाटीवरील पोलिस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्थेचा यावेळी त्यांनी आढावा घेतला. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, वांद्रे बडी मशीद, जुहू चौपाटी आणि पवई येथे वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. तसंच अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे तर काही रस्त्यांवरची वाहतूक वळवण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी वाहतूक पोलिसांचे साडेतीन हजार अधिकारी-कर्मचारी सज्ज आहेत. मध्य रेल्वेच्या विशेष फेऱ्या गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे 8 विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. तसेच पश्चिम रेल्वेनंही अनेक जलद गाड्यांना चर्नी रोड ते चर्चगेटदरम्यानच्या स्टेशनांवर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी साडेपाच पासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंतच्या दरम्यान सुटणा-या सर्व जलद गाड्या मुंबई सेंट्रल ते चर्नी रोडमधल्या सर्व स्टेशनांवर थांबवण्यात येणार आहेत. लालबागच्या राजाचा मार्ग : लालबागच्या राजासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील खास व्यवस्था करण्यात आली आहे, यावेळी राजाला लाखों भाविकासहा मुंबई पोलीस आणि पॅरा मिलिट्रीच्या फोर्सच कडं असेल. सकाळी १० च्या सुमारास निघणारी राजाची मिरवणूक चौपाटीत दाखल होता होता पहाट उजाडते. लालबाग मार्केटमधून निघाल्यावर लालबागचा राजा भारत मातावरून साने गुरूजी मार्गावर येईल, क्लेअर रोडवरून राजा थेट नागपाड्यात येईल, तेथून दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग करत, सुतार गल्ली, माधव बाग, सीपी टँक, व्ही. पी. रोड करत ऑपेरा हाऊस वरून गिरगाव चौपाटीवर प्रवेश करेल. पुण्यात जोरदार तयारी पुण्यातही विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मानच्या पाचही गणपतीच्या विसर्जन मिरवणुका सकाळी 10 वाजता सुरु होणार आहेत. तर दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक संध्याकाळनंतर सुरु होईल. मिरवणूक वेळेत आणि शांततेत पार पाडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे चोख नियोजन केलं आहे. यासाठी शहरातील प्रमुख सतरा रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. यंदा वाहतूक नियोजनासाठी विशेष रिंगरोड तयार करण्यात आला असून वाहनचालकांनी त्याचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीन करण्यात आले आहे. पुण्यात विसर्जनाची कशी तयारी?
7500 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात.
500 स्वयंसेवक सज्ज
महिला आणि वाहतूक पोलीसांची विशेष पथकं तयार
1200 सीसीटीव्हींची नजर
17 रस्ते वाहतुकीसाठी बंद
विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची नजर
कोल्हापूर-सांगली कोल्हापूर, सांगलीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीला सकाळी नऊ वाजता प्रारंभ होत आहे. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मिरवणुकीचा मुख्य मार्ग मिरजकर तिकटीमार्गे बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी, गंगावेश, जामदार क्लबमार्गे पंचगंगा घाट असा आहे. मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. दरम्यान, कोल्हापूर, सांगलीमध्ये डॉल्बी लावणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलंय. औरंगाबादमध्ये हटके तयारी तिकडे औरंगाबाद पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून थोडी हटके तयारी केली आहे. गणपतीच्या मिरवणुकीवर कोणतंही संकट ओढवू नये म्हणून पोलीस ड्रोनची मदत घेणार आहेत. तसंच वेळप्रसंगी समाजकंटकांवर ड्रोनमधून मिरची पावडरचा मारा करण्यात येणार आहे. गणपती विसर्जनासाठी औरंगाबाद पोलिसांनी 1 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवला आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकूण 53 रस्ते पूर्ण बंद
54 रस्ते एकमार्गी आहेत.
99 रस्त्यांवर वाहने पार्क करण्यासाठी बंदी करण्यात आली आहे.
मुंबईत गिरगाव चैपाटी, शिवाजीपार्क-दादर चैपाटी, बडामशिद, वांद्रे, जुहू चैपाटी आणि पवई गणेश घाट अशा महत्त्वाच्या विसर्जन ठिकाणी वाहतूक पोलिसांचे पाच विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत.
वाहतूक पूर्ण बंद 1
डॉ.बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरून होणारी वाहतूक बंद राहणार आहे.
भारतमाता जंक्शन ते बावला कंपाउंडपासूनची जड वाहनांची वाहतूक 5 सप्टेंबरपासून सकाळी 6 पासून मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील.
पर्यायी व्यवस्था -पर्याय क्र.1 - प्रवाशांनी भारतमाता जंक्शनवरुन करी रोड पूलावरुन डावीकडे शिंगटे मास्तर चौक ते एन.एम.जोशी रोड - आर्थर रोड - एस ब्रीज रोड - बाबासाहेब आंबेडकर रोड असा मार्ग वापरावा. पर्याय क्र.2 - भारतमातावरून नाईक चौक - साईबाबा मार्ग - जीडी आंबेडकर मार्गावरून डावीकडे वळून श्रवण यशवंत चौकाकडून सरळ पुढे जावे. वाहतूक पूर्ण बंद 2 2) डॉ.बाबासाहेब आंबेडकर रस्त्याने दक्षिणेकडे जाणारी वाहतूक पुढे गॅस कॉलनी जंक्शन ते साने गुरुजी मार्गापर्यंत 5 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्री विसर्जन पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे. पर्यायी मार्ग क्र.1 - गुलाबराव गणाचार्य चौक म्हणजेच आर्थर रोड नाक्यापासून पुढे आंबेडकर रस्त्याच्या दिशेने जावे. तिथून भारतमाता जंक्शनपासून उजवीकडे वळून करीरोड पूलावरून शिंगटे चौकातून डावीकडे वळावे. ना म जोशी मार्गाने आर्थर रोड नाका. आर्थर रोड जंक्शनकडे जाण्यासाठी डॉ.आंबेडकर रस्त्यावरून सरळ गॅस कंपनी जंक्शनपर्यंत जावे. पुढे काळा चौक जंक्शनवरून पुढे जाऊन बावल कंपाउंडपासून यू टर्न घ्यावा. साने गुरुजी मार्गावरून उजवीकडे वळता येणार नाही. आर्थर रोड जंक्शन कडून न म जोशी पूल - एस ब्रीज मार्ग. चिंचपोकळी रेल्वे ब्रीजमार्गाने साने गुरुजी मार्गाकडे - भारतमाता जंक्शन कडून उडवीकडे - जी जी भाई लेनमधून पुढे साईबाबा पथ येथून डाववीकडे जावे. जी.डी आंबेडकर मार्गा - श्रवण यशवंत चौक - अल्बर्ट जंक्शन - तानाजी मालुसरे मार्ग - टी.बी.कदम मार्ग - बावला कंपाउंंड - डॉ.आंबेडकर मार्ग ३) वाशी शहर - वाशी रेल्वे स्टेशन व मुंबई बाजुकडून वाशीत येणाऱ्या वाहनांसाठी जुई पुलावरून खाली उतरून पामबीच मार्गे महात्मा फुले चौक, अरेंजा सर्कलहून थेट कोपरी सिग्नल पुढे मार्ग आहे. त्याचप्रमाणे ऐरोली, कोपरखैरणेकडून वाशी शहरात येणाऱ्या वाहनांसाठी ब्ल्यू डायमंड सिग्नल चौकातून, कोपरी सिग्नल मार्गे पामबीच रोडवरून पुढे जाण्यासाठी मार्ग आहे. तसेच वाशी सेक्टर ९ ते १२कडून मुंबई व वाशी रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी महापालिका रुग्णालयासमोरून जहुगावालगतच्या शिवसेना शाखेजवळून ब्ल्यु डायमंड सिग्नल चौकातून पामबीच वरून जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. पुणे ट्रॅफिक अपडेटपुण्यातील हे मार्ग आज बंद राहतील www.abpmajha.in
नेहरु रस्ता - अस्परा टॉकिज जवळील प्रिन्स हॉटेलपर्यंत
मित्रमंडळ ते सावरकर रस्ता - चिमाजी अप्पा कॅनलपासून मित्रमंडळ चौकापर्यंत (पाटील प्लाझाच्या डाव्या बाजूला), सिंहगड रस्त्यावरून येणारी वाहने सावरकर पुतळा ते पेशवे पार्क दरम्यान सारसबागेच्या बाजूला लावता येणार आहेत.
आरटीओ ऑफिस (संगमवाडी पूलाजवळील विसर्जन घाट - सीआयडी ऑफिस ते आरटीओ रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने लावता येतील. एसएसपीएसएस मैदानाच्या बाहेरही वाहने लावता येतील.
आबासाहेब गरवारे कॉलेज जवळ - ठोसरबागेच्या जवळ आणि आबासाहेब गरवारे कॉलेजच्या मागच्या बाजूला म्हणजेच पुणे सेन्ट्रल मॉलच्या जवळ आतल्याबाजूला वाहने लावता येतील.
बाबा भिडे पूल - भिडे पूलाला जोडणारे काही रस्ते पाच सप्टेंबरला सकाळी ७ वाजल्यापासून व काही रस्ते १२ वाजेपासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहेत. तरी आपल्या सोयीनुसार भिडे पुलावरील नदीपात्रातील रस्त्यावर दोन्ही बाजूला लावता येतील. इथे वाहने लावताना एकेरी वाहनतळ ठेवण्यात आल्याने दुहेरी वाहने पार्क करू नयेत अशा स्पष्ट सूचना पुणे परिवहन विभागाने दिल्या आहेत.