मुंबई: तमाम गणेशभक्त ज्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत होते, तो गणेश चतुर्थीचा दिवस अखेर आज उजाडला आहे.

घरोघरी, मंडळांमध्ये धुमधडाक्यात बाप्पांचं स्वागत करण्यात येत आहे. ढोल-ताशे, गुलाल, फुलांच्या उधळणीमध्ये बाप्पा घरोघरी आणले जात आहेत.



मुंबईचा राजा अशी ओळख असणाऱ्या गणेश गल्लीचा राजा आणि नवसाला पावणाऱा अशी ख्याती असलेल्या सिद्धीविनायकची प्राणप्रतिष्ठा पहाटेच करण्यात आली. बाप्पांची पहिली आरतीही संपन्न झाली.

सिद्धीविनायकाच्या आरतीला शिवमणी

गणेशचतुर्थी निमित्त सिद्धीविनायकाची गणेशोत्सवातली पहिली आरती थोड्याच वेळापूर्वी झाली. या आरतीला साथ लाभली ती वाद्यांचा बादशाह असलेल्या शिवमणीच्या ताल-वाद्यांची.



सिद्धिविनायक मंदिरात आज गणेशचतुर्थीनिमित्त खास तयारी करण्यात आली आहे. मंदिराच्या कळसासह संपूर्ण मंदिर हे प्रकाशयोजनेनं न्हाऊन निघालं आहे. तर मंदिराच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील गणेशोत्सवासाठी खास मराठीतून शुभेच्छा दिल्या. दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान मोदींनी देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुण्यात प्रक्षेपण करण्यात आलं.

टिळकांच्या जन्मस्थळी जल्लोषात गणेशोत्सव

रत्नागिरीत लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळी गणरायाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.टिळकांचं जन्मस्थान असलेल्या टिळक आळीच्या बाप्पांना मानाचं स्थान आहे. 1925 पासून या सार्वजनिक बाप्पांचं पूजन केलं जातं. अत्यंत पारंपरिक आणि शिस्तबद्धपणे ढोलताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. शेकडो तरुण- तरुणींनी लेझीमच्या ठेक्यावर ताल धरत बाप्पांचं स्वागत केलं.

जालन्यात ढोलपथकं

बाप्पांच्या आगमनासाठी ढोलपथकंही सज्ज झाली आहेत. जालन्यात विक्रमगर्जना ढोल ताशा पथकाच्यावतीनं गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येला विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलंय. ढोलताशा पथकाच्या 50 जणांच्या टीमनं जोरदार वादनानं उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी जालना जिल्ह्यातल्या 11 ढोल-ताशा पथकांचा सत्कारही करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पा विराजमान

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानीही बाप्पा विराजमान झाले. नेहमी राजकीय चर्चांनी घेरलेल्या ‘वर्षा’वर, बाप्पाच्या आगमनानं उत्सवाचं वातावरण निर्माण झालं. मुख्यमंत्र्यांसह त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांच्या कन्येनं एकत्रितपणे पूजा केली.