औरंगाबाद : पत्ते खेळणं हा काही जुगार नाही आणि खेळताना काही पैसे आलेच तर दानपेटीत टाका, ते पैसे मंडळासाठी कामात येतील असं वक्तव्य औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंनी केलं आहे. तसंच ही सांगतांना चिडलेल्या खैरैंनी थेट मिडियावरही आगपाखड केली आहे. गणपतीपूर्वीच्या कार्यक्रमात पत्ते खेळायला पोलिसांनी अडचण आणू नये अशी मागणी भाजप आमदार अतुल सावे आणि शिवसेना खासदार चंद्रकांत खैरै यांनी केली आहे.


गणपती मूर्तीच्या सुरक्षेसाठी मंडळाचे कार्यकर्ते रात्रभऱ जागतात आणि त्याठिकाणी मनोरंजनासाठी पत्ते खेळतात त्यात वाईट काय असा सवाल शिवसेना-भाजपाकडून औरंगाबादेत विचारण्यात आला आहे. दुसरीकडे पत्ते खेळणं गुन्हा नाही, मात्र पत्ते खेळण्याच्या माध्यमातून कुणी जुगार खेळतांना सापडले तर कारवाई होणारच असं थेट प्रत्युत्तर औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांनी दिलं आहे.

दरम्यान प्रत्येक जण जुगार खेळत नाही, पत्ते खेळणे हा खेळ आहे आणि त्यात वावगं काय असा युक्तीवाद करत पोलिसांनी याकडं लक्ष देवू नये असं भाजप आमदार अतुल सावेंनी म्हटलं आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये पत्त्यांच्या माध्यमातून वेगळंच राजकारण रंगताना दिसत आहे.