Ganeshostav 2024  नागपूर : राज्यासह देशभरात आज गणेशउत्सव (Ganeshostav 2024) मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अवघे जण सज्ज झाले आहे. तर आज गणेश चतुर्थी निमित्त राज्यातील प्रमुख मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. अशातच नागपूरकरांचे (Nagpur) आराध्य दैवत असलेला आणि विदर्भातील अष्टविनायकपैकी प्रमुख स्थान असलेल्या गणेश टेकडी मंदिर परिसर देखील भाविकांच्या अलोट गर्दीने फुलून गेला आहे. आज पहाटेपासून गणेश टेकडीला भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. तर मंदिर प्रशासनाच्या वतीनेही मंदिर परिसरात आकर्षक सजावट, फुलांची आरास आणि विद्युत रोषनाईने सजला आहे. पुढील दहा दिवसाच्या गणेशउत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  


उपराजधानीत 1400 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,  7000 पोलीसकर्मी तैनात 


उपराजधानी नागपुरात 1400 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह हजारो नागपूरकरांच्या घरी ही गणरायाची स्थापना होत आहे. नागपुरात मूर्तिकारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चितार ओळ परिसरात सकाळपासूनच घरगुती गणपती मूर्ती खरेदी करून घरी नेण्यासाठी नागपूरकर पोहोचत आहेत. घरात गणरायाचा आगमन म्हणजे 10 दिवस आनंदाची पर्वणी असल्याचं मत वर्षांनुवर्षे घरी गणपतीची प्रतिष्ठापना करणाऱ्या भाविकांचे मत आहे. दरम्यान गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात ठीक ठिकाणी होणारी गर्दी पाहता नागपूर पोलिसांनी ही चोख बंदोबस्त ठेवला आहे. तब्बल 7000 पोलीसकर्मी या बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी तैनात राहणार आहे.


संती गणेश मंडळाच्या वतीने यंदा माहूर गडाचा देखावा 


नागपूरातील प्रसिद्ध संती गणपतीची शुभ मुहूर्तावर विधिमत पूजन करून स्थापना करण्यात आली आहे. भारताच्या प्रमुख मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यासाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे. यंदा माहूर गडाच्या रेणुका मातेचा मंदिर साकारण्यात आलं असून माहूर गडावरचा खास तांबूल चा प्रसाद 10 दिवस भाविकांना मिळणार आहे. त्यासाठी माहूरगडावरून खास पुजारी आणि कारागीर 10 दिवस संती गणेशोत्सव मंडळात उपस्थित राहणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. 


गणेश टेकडी मंदिराचा काय आहे इतिहास ?


सन 1818 साली नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या मराठा- ब्रिटिश युद्धात आप्पा साहेबांचा पराभव झाला. त्यानंतर इंग्रजांनी सीताबर्डीच्या किल्ल्यावर ताबा मिळवला. याच टेकडीचा पूर्व भाग फोडून नागपूर रेल्वे स्टेशन निर्माण करण्यात आले. सुरुंग लावून हा भाग पडत असतानाच गणेशाची मूर्ती दृष्टीत पडली. यात कारणामिळे या मुर्तीला स्वयंभू गणेश मूर्ती असे म्हटले जाते. काळाच्या ओघात मंदिरात अनेक स्थित्यंतरे आले भाविकांच्या अपार श्रद्धेतून मंदिराचा जिर्णोद्धार झाला आणि सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असे मंदिर आज भाविकांसाठी निर्माण झाले आहे


इतर महत्वाच्या बातम्या