मुंबई : यावर्षी 31 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच बुधवारी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन (Ganesh Chaturthi 2022) होणार आहे. गणपती आगमनानंतर 3 सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन होईल. राज्यभरात गौरी- गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी गणपतीसाठी भक्त सूुंदर अशी आरास तयार करतात. घरोघरी या उत्सवाचा जल्लोष असतो. राज्यभर अनेक ठिकाणी गौरी सजावटीच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. एबीपी माझाने देखील यंदा प्रथमच आपल्या प्रेक्षक वर्गासाठी या स्पर्धांचं आयोजन केलं आहे. ‘माझा’ची गौरी आरास स्पर्धा! अशी ही स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांना बक्षिस देखील देण्यात येणार आहे. माझाच्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या गौरींच्या सजवटीचे फोटो पाठवायचे आहेत.
एबीपी माझाकडून प्रेक्षक वर्गाच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून कायमच वेगेवेगळे उपक्रम राबविले जातात. तसेच या वर्षी प्रथमच माझाने प्रेक्षक वर्गासाठी गौरी आरास स्पर्धांचे आयोजन केले आहे. माझाच्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या गौरींच्या (महालक्ष्मी) सजावटीचे फोटो माझाच्या abpmajhacontest@gmail.com ईमेल आयडीवर पाठवायचे आहेत. त्यामध्ये तुमच्या गौरींच्या सजावटीचे फोटो, तुमचे नाव, तुमचा संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर पाठवायचा आहे. 3, 4 आणि 5 सप्टेंबरला हे फोटो पाठवायचे आहेत. त्यानंतर आलेल्या फोटोंचा विचार केला जाणार नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे हे फोटो याच वर्षीच्या गौरी सजावटीचे असले पाहिजेत.
महाराष्ट्रामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाचे पूजन करण्याची पद्धत आहे. या निमित्ताने घराघरात गणरायाच्या मूर्तीची विधिवत पूजा केली जाते. किमान दीड दिवस आणि जास्तीत जास्त 7 ते 10 दिवस घरांघरांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होत असतात. यंदा दोन वर्षानंतर कोरोनाचं संकट पूर्णपणे आटोक्यात आले असल्याने निर्बंधांची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्ण मोकळ्या वातावरणामध्ये आणि तितक्याच जल्लोषामध्ये गणेशोत्सव दोन वर्षांनी रंगणार आहे.
31 ॲागस्ट रोजी सकाळी 11.25 वाजल्यापासून दुपारी 1.55 वाजेपर्यंत मध्यान्हकाळ आहे. गणेश पूजनासाठी मध्यान्हकाळ महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे यावेळेत पूजा केली जाऊ शकते. गणरायाचे आमन झाल्यानंतर गौराईचंही आगमन होतं. या वर्षी 3 सप्टेंबर रोजी गौरींचे आगमन होणार आहे. माहेराला आलेल्या मुलीप्रमाणे गौराईचं कौतुक, पुजा, मान सन्मान केला जातो. त्यासाठी विविध पदार्थांसह सूंदर अशी आरास देखील केली जाते. महिला मंडळी हा उत्सव अतीशय भक्तीभावाने करतात. 3 सप्टेंबर रोजी गौरींचे आमन झाल्यानंतर 4 सप्टेंबर रोजी गौरींचे जेवण होते आणि त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी मनोभावे गौरींचे विसर्जन केले जाते. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.