गडचिरोली : तंबाखू देण्यास नकार दिल्यामुळे नातवाने 70 वर्षांच्या आजोबांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीत उघडकीस आला आहे. आजोबांवर कुऱ्हाडीचे वार करुन व्यसनाधीन तरुणाने त्यांचा प्राण घेतला.


गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरील सोमनपल्ली गावात ही घटना घडली.

गेली अनेक वर्षे गडचिरोलीत तंबाखू सेवनाबाबत अनेक चिंताप्राय गोष्टी समोर आल्या आहेत, मात्र तंबाखूचं व्यसन नाती विसरुन रक्ताचे पाट वाहण्यास कारणीभूत ठरल्याचं पाहायला मिळालं.

गडचिरोलीचे दक्षिण टोक म्हणजे सिरोंचा. या तालुक्याचा काही भाग उत्तम जातीच्या व्हर्जिनिया तंबाखू निर्मितीसाठी ओळखला जात होता. या तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील सोमनपल्ली हे छोटेसे गाव. या गावात तलांडी कुटुंब वास्तव्याला आहे.

या कुटुंबातील 27 वर्षीय सुभाष तलांडीने राजम तलांडी या आपल्या 70 वर्षांच्या आजोबांची निर्घृण हत्या केली. तंबाखूच्या सेवनाची सवय असलेल्या नातवाने आजोबांकडे त्याची मागणी केली. आजोबांनी ती नाकारली. रागाने बेभान झालेल्या नातवाने घरातून कुऱ्हाड आणून सपासप वार करत आजोबाच्या देहाचे तुकडे केले.

पोलिसांनी आरोपी सुभाष तलांडी याला अटकही केली. मात्र गेली काही वर्षे गडचिरोली जिल्ह्याचा तंबाखू सेवनासाठी होत असलेला वाईट लौकिक या घटनेने अधिक ठळकपणे पुढे आला.

तंबाखूच्या एका चिमटीसाठी हत्या, दहा रुपयाचा खर्रा खाण्याच्या आमिषाने शाळकरी मुलीवर अत्याचार, एका सिगारेटसाठी लहान मुलांना झालेली मारहाण ही काही उदाहरणे तंबाखूच्या दुष्परिणामांचे हिमनगाचे टोक आहे. गडचिरोली असो वा राज्यातील इतर भाग पालकांनी वेळीच जागृत न झाल्यास तंबाखू एका पिढीला गिळंकृत करणार आहे.