पाण्याच्या पातळीत अजून वाढ होत असून भामरागडला चोही बाजूने पाण्याने वेढलं आहे. त्यामुळे प्रशासनाने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम रात्रीपासून सुरु केलं आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावरील कुंभरगुडा नाल्याची पातळी वाढल्याने संपूर्ण मार्ग बंद पडला आहे. परिणामी 100 हून अधिक गावांचा संपर्क मुख्यालयाशी तुटला आहे.
या पुराचा फटका राज्य परिवहन महामंडळाही बसला आहे. अहेरीवरुन भामरागड तालुक्यात जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या अनेक बस सोमवारपासून भामरागडमध्ये अडकून पडल्या आहेत. या भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. भामरागड शहराला लागून छोटे नाले आहेत, त्याचं पाणीही गावात शिरलं असून भामरागड शहराला बेटाचे स्वरुप आलं आहे. त्यामुळे भामरागडमध्ये बोटी दिसू लागल्या आहेत.