गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी विशेष अभियान पोलिसांनी तीन जहाल माओवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जेसीबी जाळणे, केडमारा येथे झालेले चकमक प्रकरण आदी गुन्ह्यांत या आरोपींचा सहभाग आहे. गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. माओवाद्यांच्या या देशविघातक कृत्यांना गडचिरोली पोलीस दल नेहमीच सामोरे जाऊन आळा घालतात.
गोपनीय खबरीच्या आधारे उपविभाग भामरागड हद्दीतील पोलीस मदत केंद्र ताडगाव जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. त्या दरम्यान जहाल माओवादी सरजु ऊर्फ छोटु बंडु महाका, वय 28 वर्षे आणि मधु ऊर्फ अनु महारु कुमोटी, वय 23 वर्षे दोघेही रा. हलवेर, भामरागड, यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोणत्या घटनेत होते सहभागी
गुन्ह्यामध्ये विसामुंडी जवळ विसामुंडीला जोडणाऱ्या पुलावर काम करणाऱ्या ठेकेदाराचा मिक्सर आणि जेसीबी जाळला होता. माओवादी सरजु हा सन 2010 मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2018 पर्यंत कार्यरत होता. त्याचा मौजा रेंगेवाही चकमक, नारगुंडा चकमक (2011), कुंजेमर्का चकमक व मर्दहुर चकमक (2017) असे 4 चकमक व घोटपाडी व पेनगुंडा येथील 2 निरपराध व्यक्तींच्या खुनात सहभाग होता. तसेच माओवादी मधु हा सन 2015 मध्ये भामरागड दलममध्ये भरती होऊन सन 2017 पर्यंत कार्यरत होता. त्याचा मुत्तेमकुही चकमक, दरबा चकमक (2017), कुंडुम चकमक (2016) अशा एकुण 3 चकमक व मौजा गोंगवाडा व घोटपाडी येथील 2 निरपराध व्यक्तींच्या खुनात सहभाग होता.
तिसऱ्या नक्षलला ही केली अटक
यासोबतच उपविभाग भामरागड येथील पोमके नारगुंडा व पोस्टे. भामरागड हद्दीतील कियर जंगल परिसरात जहाल माओवादी अशोक लाला तलांडी, वय 30 वर्षे, रा. पासेवाडा, तह. कुडरु, जि. बिजापुर (छ.ग.) हा लपून बसला होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाच्या पोमकें नारगंुडा पोलीस पार्टी, डी-37 बटा. सीआरपीएफ व विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना त्याला ताब्यात घेण्यात आले. तो सन 2017 मध्ये छत्तीसगड येथील सँड्रा दलम मध्ये सदस्य पदावर भरती झाला व त्यानंतर मागील 02 वर्षापासुन स्वत:चे घरी राहुन माओवादी चळवळीमध्ये अध्ुन-मधुन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कार्यरत होता. 30/04/2023 रोजी मौजा केडमारा येथे झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. या चकमकीमध्ये 03 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते. यासोबतच सन 2018 मध्ये मौजा गोरटुल ते बडाकोक्केर जाणाऱ्या रस्त्यावर व चेरपल्ली ते एडापल्ली जाणाऱ्या बैलगाडी रस्त्यावर बॉम्ब लावण्यात तसेच मौजा गोरटुल येथील 01 निष्पाप व्यक्तीच्या खुनात त्याचा सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने या तिन्ही माओवाद्यांवर प्रत्येकी 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 70 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे.