Gadchiroli Naxal: गडचिरोली जिल्हा (Gadchiorli) हा राज्यातील नक्षलवादी (Naxal) घडामोडींचं केंद्र मानला जातो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सध्या नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू आहे. याच शहीद सप्ताहादरम्यान (Shahid Saptah) सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. कुरखेडा तालुक्यातील कोटगुल पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या हेटळकसा जंगलात नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेली स्फोटकं सामुग्री पोलीस दलाने शोधून काढली आहे. 


विशेष अभियान पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या जवानांना गस्ती दरम्यान हे मोठे यश मिळाले आहे. पथकाने 500 लिटरच्या पाणी साठवण्याच्या प्लास्टिक टाकीत स्फोटके - इलेक्ट्रिक वायर आणि अन्य नक्षल सामग्री दोन कूकरसह जमिनीत पुरून होती. त्यापैकी एका स्फोटक भरल्या कुकरचा जवानांनी जंगलातच नियंत्रित स्फोट केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करत अज्ञात नक्षलवाद्यांविरोधात शोध अभियान सुरू करण्यात आले आहे. 


नक्षली जंगलात घातपात घडविण्याच्या उद्देशाने याकाळात खरेदी केलेली स्फोटके गोपनीय जागी पुरून ठेवतात. कालांतराने हीच स्फोटके सुरक्षादलांना लक्ष्य करून उडवली जात असल्याने या जप्तीला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या या कारवाईचे अभिनंदन केले जात आहे.


मागील महिन्यात तीन नक्षल समर्थकांना अटक



मागील महिन्यात नक्षलवाद्यांना (Naxal) मदत करण्याच्या आरोपात कंत्राटी सरकारी MBBS डॉक्टरसह तीन नक्षल समर्थकांना अटक करण्यात आली होती. पोलीसाची गस्त सुरु असताना नक्षल्यांचे शहीद सप्ताहाचे बॅनर लावतांना तीन जणांना ताब्यात घेतले होते. गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर भागात काही अज्ञात व्यक्ती नक्षलवाद्यांना बांधत असल्याची माहिती पोलीस विभागाच्या हाती लागली. त्यानुसार पोलिसांकडून ऑपरेशन राबवण्यात आले होते. अटक केलेल्यांमध्ये कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या MBBS डॉक्टर पवन उईकेचा समावेश आहे. डॉक्टरांसह या तिघांकडून नक्षल्यांना रसद पुरवली जात असल्याचा संशय आहे. या तिघांवर UAPA( बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करणे) या कलमासह कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात नक्षलवादाची दहशत निर्माण करण्यासाठी हे बॅनर नक्षलवादी नेहमी जंगल भागात लावले जातात. या आठवड्यात एक सरपंचाची नक्षलवाद्यांनी हत्या केली. या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीसांनी ऑपरेशन राबवले होते.