गडचिरोली : बैलपोळा (Bailpola) सणाच्या दिवशी गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात एक दुःखद घटना समोर आली आहे. पोळा सणाच्या निमित्याने सुट्ट्या घेऊन शाळेतून घरी आलेला 6 वर्षाच्या चिमुकल्याचा गावालगत असलेल्या नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भामरागड तालुक्यातील कोयार इथं घडली आहे. रिशान प्रकाश पुंगाटी असे मृत मुलाचे नाव आहे.
नाल्याजवळ खेळायला गेला परत माघारी आलाच नाही
रिशान हा लाहेरी शासकीय आश्रम शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होता. पोळा सणानिमित्त तो कोयार गावी आला होता. दरम्यान शुक्रवारी सकाळी तो नाल्याजवळ खेळायला गेला आणि बराच वेळ परतला नाही. त्यामुळं शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान त्याला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी नारगुंडा येथे खाटेची कावड करून नेण्यात आले. रस्ताच नसल्याने तिथे रुग्णवाहिका येऊ शकत नव्हती. त्यानंतर भामरागड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका नारगुंडा येथे आली. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.
अकोल्यात बैलांना धुण्यासाठी नदीवर गेलेल्या तरुणाचा बडून मृत्यू
अकोल्यातून (Akola) एक दु:खद बातमी समोर येत आहे. बैलपोळ्याचा आनंद क्षणात हिरवल्याची घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. बैलपोळ्याच्या अनुषंगाने बैलांना नदीत अंघोळीसाठी घेऊन गेला असता, पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातल्या खोळद गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. शंतनू अविनाश मानकर असं या नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे खोळद गावात हळहळ व्यक्त होत आहे. तर मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शंतनू हा अविनाश मानकर यांचा एकुलता एक मुलगा होता. घटनास्थळी भाजपचे आमदार हरीश पिंपळे आणि पोलीस दाखल झाले होते. काटेपूर्णा येथील वीर भगतसिंग आपातकालीन शोध व बचाव पथकाकडून पेढी नदीत वाहून गेलेल्या तरुणाच्या शोधार्थ शोध कार्य सुरु आहे.
दरम्यान, आज राज्यभर मोठ्या उत्साहात बैलपोळ्याचा सण साजरा केला जात आहे. अशा या सणाच्या दिवशीच राज्याच्या काही भागात दुर्दैवी घटना घडल्या आहेत. गडचिरोलीत लहान मुलाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला आहे, तर अकोल्यात बैलांना नदीवर घेऊन गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनांमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या: