गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी रचलेला घातपाताचा मोठा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. नक्षल्यांनी घातपाताच्या उद्देशाने लावलेले 15 कि. ग्रॅ. वजनाचे क्लेमोर माईन निकामी करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलं आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.


गडचिरोली पोलीस दलाने उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके लाहेरी हद्दीतील लाहेरी ते धोडराज रस्त्यावर शोध अभियान राबविले होते. त्यावेळी रस्त्यावर त्यांना 15 कि. ग्रॅ. वजनाचे क्लेमोर माईन आढळून आले. नक्षलवाद्यांनी घातपाताच्या दृष्टीनं ही स्फोटकं पुरुन ठेवली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांना घटनास्थळी पाचारण केलं. पथकांना 15 कि. ग्रॅ. वजनाचे क्लेमोर माईन घटनास्थळीच सुरक्षितरित्या निकामी करण्यात यश आलं. पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा कट फसला आणि घातपाताच डाव उधळला गेला.


दरम्यान, 2 ते 8 डिसेंबर नक्षली संघटनेने PLGA (People's Liberation Guerrilla Army)च्या 19 व्या वर्षपूर्ती दिनानिमित्त संपूर्ण दंडकारण्य बंदच आव्हान केलं आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी नक्षल्यांकडून भामरागडच्या लाहेरी ते धोडराज रस्त्यावर 15 किलो स्फोटकं ठेवली होती. यातून मोठा घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. क्लेमोर माईन नष्ट करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

अधिाऱ्यांनी दिलल्या माहितीनुसार, स्फोटकाचं वजन पाहता मोठी हानी जिवीतहानी होण्याची शक्यता होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक शैलेश बालकवडे यांनी पोलिसांना गौरवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी सदर प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचेही त्यांनी सांगितले.