पंढरपूर : विठ्ठल भक्तांना कोरोना संकटानंतर पहिल्यांदा मोठी खुशखबर मिळाली असून एबीपी माझाच्या प्रयत्नानंतर आजपासून देशभरातून आलेल्या विठ्ठल भक्तांना आता केवळ ओळखपत्र दाखवून विठुरायाचे दर्शन घेता येऊ लागले आहे. कोरोनानंतर विठ्ठल मंदिर कोरोनाचे नियम पाळत दिवाळी पाडव्यापासून सुरु झाले. मात्र केवळ ऑनलाईन बुकिंग असणाऱ्या भाविकांना मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेता येत होते. यामुळे शेकडो किलोमीटरवरून आलेल्या भाविकांना ऑनलाईन व्यवस्थेबाबत माहिती नसल्याने त्यांना विठ्ठल मंदिराच्या बाहेरूनच नामदेव पायरीचे दर्शन घेऊन परतावे लागत असे, याचे वास्तव एबीपी माझाने दाखवल्यानंतर मंदिर समितीने आपल्या बैठकीत ऑनलाईन पास नसला तरी केवळ ओळखपत्र दाखवून मंदिरात सोडण्याचा निर्णय घेतला.


आज पहिल्याच दिवशी राज्यभरातून आलेल्या शेकडो भाविकांना देवाचे मंदिरात जाऊन दर्शन घेता येऊ लागले आहे. या भाविकांनी विठुरायाच्या दर्शनामुळे आनंद झाल्याचे सांगताना एबीपी माझाचे आभार मानण्यासही विसरले नाहीत.


आज सकाळी सहा वाजल्यापासून जे पर्यटक व भाविकांची गर्दी दर्शनासाठी मंदिराबाहेर नामदेव पायरीजवळ जमा व्हायची ती गर्दी आज दर्शन रांगेतील प्रवेशाच्या ठिकाणी जमा होताना दिसत होती. या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळत भाविकांना मंदिरात सोडण्यात येत होते. मात्र कोरोनाच्या नियमामुळे आपल्यासोबत लहान मुले आणि वृद्ध असणाऱ्या भाविकांना मात्र मंदिरात सोडण्यात येत नव्हते, अशी मंडळी नामदेव पायरी समोरून देवाचे दर्शन घेत होते. विठुरायाच्या भक्त मंडळींमध्ये बहुतांश वारकरी संप्रदाय हा वयस्कर असल्याने त्यांना थेट शासनाने एसटी बसच्या तिकिटातही निम्मी सवलत दिली आहे. मात्र कोरोनाच्या नियमामुळे या भाविकांना अद्याप मंदिरात प्रवेश नसला तरी कोरोनाचा धोका संपल्यानंतर अशा भाविकांवरील निर्बंधही शासनाकडून मागे घेतल्यावर त्यांनाही देवाचे दर्शन घेता येणार आहे.