वर्धा : इंस्टाग्राम पोस्टवरुन मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना वर्ध्यात घडली आहे. या घटनेत मृतकासोबत असलेले तीन मित्रही जखमी झाले आहेत. समीर मेटांगळे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. मारेकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
समीर मेटांगळेने दोन दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. त्यावरून समीर आणि विभव गुप्तामध्ये वाद झाला. दोघेही बारावीच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत. शिवाय एका खासगी ट्यूशन क्लासमध्ये ते सगळे एकत्र असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
समीर मेटांगळे आणि विभव गुप्ता आपापल्या मित्रांना घेऊन वर्ध्याच्या म्हाडा कॉलनी चौकामध्ये भेटले. तिथे या वादातून विभव गुप्ताने समीर मेटांगळेलाधारदार शस्त्राने भोसकलं. त्यात समीरचा मृत्यू झाला. तर त्याला वाचवायला गेलेले तीन मित्रही जखमी झाले.
समीरने केलेली ती पोस्ट काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत... पण व्हर्च्युअल जगातल्या संभाषणांमधल्या मतभेदामधून मुडदे पडणं ही चिंतेची गोष्ट आहे.